दोन गटांत राडा प्रकरण : चकवा देत पळालेला आरोपी जेरबंद | पुढारी

दोन गटांत राडा प्रकरण : चकवा देत पळालेला आरोपी जेरबंद

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांना चकवा देऊन आरोपीने धूम ठोकली. या घटनेने पोलिसांची भंबेरी उडाली. मात्र, काही वेळातच बाजरीच्या पिकात लपून बसलेल्या या आरोपीस पोलिसांनी कवळी घालत ताब्यात घेतले. हा प्रकार शनिवारी (दि.23) दुपारी 1 वाजता ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात घडला. शेवगाव शहरातील ईदगाह मैदानात शुक्रवारी (दि.22) दोन गटांत तीक्ष्ण हत्याराने एकमेकांवर हल्ला झाला. याबाबत एका गटातील सहा जणांवर ठार मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल झाला. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या परवेज मेहबुब शेख याच्या छातीत दुखत असल्याने त्याच्यासह या गुन्ह्यातील मज्जु उर्फ मुद्दसर साजीद सय्यद, अरमान उर्फ सर्फराज गणी पिंजारी, अशा तीन आरोपींना पोलिस शनिवारी वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीन रुग्णालयात घेऊन गेले. तेथे परवेज शेख यास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, तो खाली पडला. याचा फायदा घेत आरोपी मज्जु उर्फ मुद्दसर याने पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकली.

याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक दिगंबर भताने यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. फरार आरोपीचा शोध घेत असताना तो ग्रामीण रुग्णालयाच्या काही अंतरावर बाजरी पिकात लपून बसल्याचे निर्दशनास येताच पोलिसांनी त्यास पकडले. पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर फसले यांच्या फिर्यादीवरून मज्जु सय्यद याच्या विरोधात पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शेवगाव शहरातील ईदगाह मैदान येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मागील भांडणाची कुरापत काढून लोखंडी रॉड, चॉपरने मारहाण केल्याबाबत हर्षद अल्ताफ इनामदार (रा.इंदिरानगर, शेवगाव) याने दिल्यावरून फिर्यादीवरून झहीर उर्फ जज्जा शेख (रा.शेवगाव), मज्जू उर्फ मुद्दसर सय्यद, पापा उर्फ परवेज शेख, अरमान शेख, शाहरुख शेख, वसीम शेख (रा.पाथर्डी) यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांवर हल्ला केल्याच्या घटनेत तिघे जखमी झाले असून, रात्री उशीरापर्यंत दुसर्‍या गटाचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचा

Back to top button