Ramadan 2024 | स्पेशल मालपुवा रमजानचे आकर्षण | पुढारी

Ramadan 2024 | स्पेशल मालपुवा रमजानचे आकर्षण

जुने नाशिक : कादिर पठाण

रमजान महिन्यात बाजारात असे काही खास पदार्थ अगदी सहजपणे उपलब्ध असतात, जे वर्षभर शोधूनही मिळत नाहीत, त्यात एक म्हणजे मालपुवा. सध्या मुस्लीम बांधवांचे रमजान पर्व सुरू असून, जुने नाशिक परिसरात मिनारा मशिदीजवळ प्रसिद्ध मिनारा स्पेशल मालपुवा अल्पदरात खवय्यांच्या सेवेत उपलब्ध आहे. गोड पदार्थांवर विशेष प्रेम असणाऱ्यांनी या ठिकाणी मालपुवाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा भेट दिली पाहिजे.

तसे तर रोजा सोडण्याआधी याठिकाणी मालपुवाची विक्री सुरू होते. परंतु इफ्तार झाल्यावर म्हणजेच रात्री ८ पासून येथील दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळते. लहान मुले व महिलांना मालपुवा पसंत असल्यामुळे त्याच ठिकाणी खाणाऱ्यांबरोबरच घरी पार्सल नेणाऱ्यांची संख्यादेखील मोठी असते. सर्वधर्मीय श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद सादिक शाह हुसैनी बाबा बडी दर्गा येथे दर्शनासाठी जुने नाशिकमधून बहुतांश श्रद्धाळू मिनारा मशिदीच्या मार्गाने जातात. म्हणून फक्त रमजान महिन्यापर्यंत इथे थाटणारी मालपुवाच्या दुकानांवर मालपुवा चाखण्यासाठी लोक येथे गर्दी करत असतात.

रमजानच्या काळात शहरात अन्य काही ठिकाणीही मालपुवा विकला जातो. परंतु मिनारा मशीद भागातील स्पेशल मालपुवाला खवय्यांची सर्वात जास्त पसंती असते. -सिकंदर शेख, मालपुवा विक्रेता.

स्पेशल मालपुवामध्ये मैदा, साखर, अंडी, वेलदोडा, मलाई बर्फीसह ड्राय फ्रूट आदी सामग्री असते. मालपुवासाठी तुपात तळलेली अंडी व मैद्याची रोटी तयार झाल्यावर ग्राहकांच्या आवडीनुसार मलई बर्फी टाकण्यात येते. यात साधी मलई बर्फी, चॉकलेट मलई बर्फी, मँगो मलई बर्फी, अंजीर मलई बर्फी असे पर्याय असतात.

हेही वाचा:

Back to top button