मॉस्को : वृत्तसंस्था ; अंतराळात अण्वस्त्र प्रणाली उभारून उपग्रहांवर मारा करता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या रशियाच्या तयारीने अमेरिकेच्या गोटात आधीच घबराट असताना आता रशियाची नवी खळबळजनक योजना समोर आली आहे. रशिया व चीन मिळून चंद्रावर अणुऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहेत. न्युक्लिअर कार्गो स्पेसक्राफ्टही बनविण्याची तयारीही रशियाने चालविली आहे.
रशियान अंतराळ संस्था रोसकॉसमॉसने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेने रशियावर केलेल्या उपग्रह संहारक अण्वस्त्र क्षेपणास्त्रांबाबतच्या आरोपाचा रशियाने इन्कार केला होता; मात्र चंद्रावरील अणुऊर्जा प्रकल्पाची अधिकृत माहिती दस्तुरखुद्द रशियाने दिली आहे.
संबंधित बातम्या
रशिया आणि चीन एकत्रितपणे चंद्रावरील या कार्यक्रमावर काम करत आहेत, असे रशियाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रशिया आणि चीनचा चंद्रावरील संयुक्त अणुऊर्जा प्रकल्प 2033-35 पासून सुरू झालेला असेल, असे रॉसकॉसमॉस अंतराळ संस्थेचे प्रमुख तसेच रशियाचे माजी उपसंरक्षणमंत्री युरी बोरिसोव्ह यांनी सांगितले. नाही तरी एक दिवस चंद्रावर मानवी वसाहती होतीलच. त्यासाठी हा प्रकल्प कळीचा मुद्दा ठरेल.
भविष्यातील चंद्र वसाहतींना पुरेशी वीज देण्यात सौर पॅनेल कुचकामी ठरतील. अणुऊर्जा हाच चंद्रावरील मानवी वसाहतींसाठी योग्य पर्याय ठरेल, असेही ते म्हणाले.
मूल्यवान धातूंच्या शोधात रशिया चंद्रावर खननही करणार आहे. जगाच्या इतिहासात भारताचे चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदा उतरले तेव्हा रशियाने त्याआधी पोहोचेल अशा बेताने यान सोडलेले होते; पण ते कोसळले, हे येथे उल्लेखनीय!
रशिया आण्विक शक्तीने चालणारे कार्गो स्पेसशिप तयार करणार. अणुभट्टी थंड कशी करायची यासह सर्व तांत्रिक प्रश्न सोडवण्यात आले आहेत. टर्बाईन्स उच्चशक्तीच्या असतील. एका कक्षेतून दुसर्या कक्षेत माल नेण्यात, अवकाशातील कचरा गोळा करण्यात हा प्रकल्प उपयुक्त ठरेल.