भाजपचे 185, तर काँग्रेसचे 130 जागांवर मंथन; भाजपची उद्या बैठक | पुढारी

भाजपचे 185, तर काँग्रेसचे 130 जागांवर मंथन; भाजपची उद्या बैठक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता पाहता, प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीला वेग दिला आहे. भाजपची उमेदवार निवडीसाठीची पुढची बैठक शुक्रवारी (दि. 8) होणार आहे. यात महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील 185 ते 200 जागांवर मंथन होणार असल्याचे समजते; तर त्याआधी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक उद्या (दि. 7) होणार असून, त्यात 130 उमेदवारांची निवड अपेक्षित आहे. अर्थात, काँग्रेसकडून उमेदवार यादी निवडणूक घोषणेनंतरच होईल, असे समजते.

संबंधित बातम्या 

भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजप 300 हून अधिक जागांवर उमेदवार जाहीर करण्याच्या तयारीत आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असलेली 195 उमेदवारांची यादी भाजपने घोषित केली होती. आता केंद्रीय निवडणूक समितीच्या दुसर्‍या बैठकीत सुमारे 185 ते 200 जागांवर विचारविनिमय होईल. त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांतील जागा आहेत. मात्र, आघाडीच्या राज्यांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर पक्षाला यश मिळाले, त्याच जागांवर भाजप मंथन करेल. ज्या जागांवर मित्रपक्षांशी चर्चा झालेली नाही, त्या जागांवर निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा होणार नाही.

दुसरीकडे, काँग्रेसच्या उद्या होणार्‍या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, दिल्ली या राज्यांच्या जागांवर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या पहिल्या बैठकीत राहुल गांधी यांच्या नावाला मंजुरी दिली जाणार असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.

राहुल गांधी अमेठीतूनच?

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अमेठीतून राहुल गांधींच्या नावाला मंजुरी देण्यात येणार आहे. पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत याची घोषणा केली जाणार आहे. प्रियांका वधेरा रायबरेलीमधून निवडणूक लढवणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, पहिल्या यादीत रायबरेलीच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याआधी त्याची पार्श्वभूमी पूर्णपणे तपासण्याचे निर्देश काँग्रेस श्रेष्ठी आणि गांधी कुटुंबातील नेत्यांनी निवडणूक समितीला दिले आहेत. नाव जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवाराने भाजपमध्ये जाऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

Back to top button