‘निकाह’वरून मढीत तणाव; मुलगी ताब्यात देण्याची मागणी | पुढारी

‘निकाह’वरून मढीत तणाव; मुलगी ताब्यात देण्याची मागणी

मढी: पुढारी वृत्तसेवा : सक्तीने धर्मांतर घडवून मढी येथील तरुणीचा ‘निकाह’ सुरू असल्याच्या माहितीने मढीसह परीसरात तणाव निर्माण झाला. सर्वपक्षीय ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिसांना निवेदन दिले. ‘मुलगी परत द्या, अथवा परिणामांना तयार राहा’,असा असा इशारा देत मढी गावकर्‍यांनी कडकडीत बंद पाळला. शुक्रवारी रात्री मढीतील तरुणीला ‘जिहादी’ तरुणाने फूस लावून पळून नेले. नामांतर करत तिच्याशी ‘निकाह’ केला. दोघेही ‘राजी-कबुल’ झाले. त्यानंतर दोन दिवसांनी हे जोडपे पोलिस ठाण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. गावकरी, नातेवाईक, कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तरुणीस समजावण्याचा प्रयत्न केला, पण तणावाखाली असलेली मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तिची रवानगी महिला सुधारगृहात केली. दुसर्‍या दिवशी पुन्हा गावातील दुसर्‍या तरुणीस अशाच पध्दतीने फूस लावून पळविण्याचा प्रकार झाला, पण ती मुलगी भिंगारजवळून माघारी गावात परतली.

सरपंच संजय मरकड यांची अधिक चौकशी करता गावातील अन्य तरुणींचे आधारकार्डावर संशयास्पद बदल झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही माहिती परिसरातील निवडुंगे, घाटशिरस, तिसगाव, पारेवाडी, मांडवा, शिरापूर, धामणगावात कळविताच नागरिक संतप्त झाले. भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष विद्या गाडेकर यांच्यासह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. बुधवारी गावकरी, हिंदू समाज व संघटनांनी मढी येथे ग्रामसभा घेतली. घटनेचा निषेध करत गावकरी आक्रमक झाले. गंभीर प्रकार होवूनही प्रशासन दखल घेत नसल्याचा निषेध करण्यात आला.

देवस्थानच्या इनामी जमिनी देवस्थान समिती किंवा ग्रामपंचायतीकडे वर्ग करून घ्यावात, संबंधितांशी आर्थिक व्यवहार बंद करावे, धर्मांतर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, शाळा सुटतेवेळी रस्त्यावर पोलिसांची गस्त सुरू करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. डीवायएसपी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी गावकरी व शिष्टमंडळासोबत चर्चा करत माहिती घेतली. सरपंच संजय मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड, सुभाष मरकड, दीपक महाराज काळे, विश्व हिंदू परिषदेचे पप्पू पालवे उपस्थित होते. बळजबरीने ‘निकाह’ लावणार्‍यांविरोधात कारवाई व्हावी, मुलीचा ताबा पालकाकडे मिळावा, अशी मागणी करण्यात आली. कोणत्या धर्माच्या तरुणीशी ‘निकाह’ केला तर काय मिळेल याचे माहिती जारी करण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

गावकर्‍यांच्या भावना तीव्र आहेत. परिसरात शांतता ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी असलेल्या नियोजन बैठकीवेळी दोन्ही समाजातील प्रतिष्ठीतांसह शांतता समितीची बैठक घेतली जाईल. जातीय सलोखा टीकवावा, तालुक्यातील वातावरण बिघडू देऊ नये.

– संतोष मुटकुळे, पोलिस निरीक्षक

हेही वाचा

Back to top button