चिंच झोडपणी हंगाम सुरू; दुष्काळी परिस्थितीत महिलांना रोजगार | पुढारी

चिंच झोडपणी हंगाम सुरू; दुष्काळी परिस्थितीत महिलांना रोजगार

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असल्याने, वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात चिंच झोडणीचे काम जोरदार सुरू आहे. चिंच झोडणीच्या कामामुळे ग्रामीण भागातील महिला मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. त्यांना पाच किलो चिंच फोडणीसाठी 60 रुपये मिळत आहेत. एक महिला दिवसांतून 25 ते 40 किलो चिंच फोडणी करते. त्यामुळे त्यांना 300 ते 500 रुपयांपर्यंत रोजंदारी पडते. या वर्षी पुरंदर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतमजूर, महिलावर्ग आर्थिक संकटात आहेत. अशावेळी चिंच फोडणी कामाने महिलांच्या हाताला काम मिळत आहे.

चिंचा झोडण्याचे काम फेब्रुवारीमध्ये सुरू होते आणि मे महिन्यापर्यंत संपते. या चार महिन्यांत ग्रामीण भागात मोठी रोजगारनिर्मिती होते. शेतीच्या कामांनाही मजुरांची टंचाई भासते. झाडावर चढून बांबूने झोडपून चिंचा खाली पाडणे, पडलेल्या चिंचा वेचणे, त्यांच्यावरील टरफल बाजूला करणे, चिंचा फोडून गर व चिंचोके वेगळे करणे यासाठी मजूर मोठ्या प्रमाणात लागतात. चिंचा झोडणार्‍यांना प्रतिदिन 500 रुपये, तर चिंचा वेचणार्‍या महिलांना 250 रुपये मजुरी मिळते. टरफल बाजूला केल्यानंतर चिंचा फोडतात. चिंचेपासून साधारणतः 55 टक्के गर, 14 टक्के चिंचोके व 11 टक्के टरफल व शिरांचे उत्पादन मिळते.

या वर्षी चिंचेला अपेक्षित बाजारभाव नाही. फोडलेल्या चिंचेला प्रतिकिलो 70 ते 90 रुपये बाजारभाव मिळतोय. तर, अखंड चिंचेस प्रतिक्विंटल 1500 ते 3500 पर्यंत बाजारभाव आहे. झाडांच्या फांदीवरून धोकादायक पद्धतीने झोडपणी करावी लागते; यासाठी मंजूर टंचाई निर्माण भासते. अगोदर पैसे देऊनही मजूर मिळत नाहीत.

– अहमद इनामदार, चिंच व्यापारी, वाल्हे.

 हेही वाचा

Back to top button