बारामती : दोन माजी नगराध्यक्षांवर शरद पवार गटाकडून मोठी जबाबदारी | पुढारी

बारामती : दोन माजी नगराध्यक्षांवर शरद पवार गटाकडून मोठी जबाबदारी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दोन माजी नगराध्यक्षांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांना लोकसभा मतदारसंघाचे प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. याशिवाय माजी नगराध्यक्ष जवाहर शाह-वाघोलीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे यांच्यावर शहर व तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सातव कुटुंबीयांचे पूर्वीपासूनच पवार कुटुंबीयांशी विशेषतः शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत. सदाशिव सातव व त्यांच्या पत्नी जयश्री या दोघांनीही बारामतीचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यांचे चिरंजीव सचिव सातव हे सध्या अजित पवार यांच्यासोबत असून, त्यांच्याकडे बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मागील पंचवार्षिक कालावधीत त्यांनी नगरपरिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून काम पाहिले.

त्यांच्या पत्नी सुहासिनी यांनीही नगरसेविका म्हणून काम केले आहे. सदाशिव सातव यांचे दुसरे दुसरे चिरंजीव नितीन सातव हे सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. सातव कुटुंबामध्ये धों. आ. सातव यांच्यापासून मोठी राजकीय परंपरा आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर सचिन सातव हे पहिल्या दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पवार यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या आहेत. त्यात आता सदाशिव सातव यांच्याकडे खुद्द शरद पवार यांच्याकडून लोकसभा मतदारसंघाचीच जबाबदारी सोपवली गेल्याने मोठी चर्चा बारामतीत सुरू आहे. माजी नगराध्यक्ष जवाहर शाह-वाघोलीकर यांच्यावर शहराची, तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्यावर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही सर्व मंडळी शरद पवार यांचे जुने सहकारी आहेत.

याबाबत बुधवारी (दि. 6) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सदाशिव सातव व आमच्या कुटुंबाचा जुना स्नेह आहे. ते आमच्या कुटुंबाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल मी आभार मानते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करू. जवाहर शाह-वाघोलीकर, सुभाष ढोले, सतीश खोमणे, एस. एन. जगताप, अ‍ॅड. संदीप गुजर, सत्यव—त काळे आदींवर वेगवेगळ्या जबाबदार्‍या दिल्या आहेत, ते त्या समर्थपणे पेलत आहेत.

अर्ज दाखल केल्यानंतरच बोलणार : सुनेत्रा पवार

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पवार परिवारामध्ये मोठी दरी वाढत चालली आहे. यासंदर्भातील प्रश्नावर सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच या सर्व प्रश्नांना उत्तर देईन, असे त्यांनी सांगितले. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार यांनी ‘जर कोण मतदारसंघात दहशत वाजवत असेल, तर माझ्याशी संपर्क करा व माझ्याकडे तक्रार करा,’ असे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना केले. त्यासंदर्भात हा प्रश्न विचारण्यात आला होता.

हेही वाचा

Back to top button