ताशी 130 कि.मी. वेगाने धावली रेल्वे; निंबळक ते वांबोरी चाचणी यशस्वी | पुढारी

ताशी 130 कि.मी. वेगाने धावली रेल्वे; निंबळक ते वांबोरी चाचणी यशस्वी

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत निंबळक ते वांबोरी या 22 किलोमीटर अंतराची यशस्वी चाचणी गुरुवारी (दि.29) घेण्यात आली. या मार्गावर रेल्वे ताशी 130 प्रति किलोमीटर वेगाने धावली. लवकरच नगर ते मनमाडपर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून नगर ते मनमाड द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.

या पुर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. गुरुवारी निंबळक ते वांबोरी डबललाईन रेल्वेमार्गाची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 107 किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेचे उपमुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली. मनमाड ते दौंड रेल्वेमार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्वपूर्ण टप्पा येतो. मात्र, हा मार्ग सिंगललाईन असल्याने रेल्वेचा वेग कमी होता. तसेच, सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता.

तासोन्तास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागे. मात्र, आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करून डबललाईन करण्यात येत असल्याने रेल्वेगाड्यांना विनाकारण थांबा आता बंद होणार आहे. तसेच, या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किलोमीटर वेगाने धावणार असल्याने रेल्वे सुपरफास्ट होणार आहे. चाचणीवेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्रशासकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उपमुख्य अभियंता दीपककुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. गायकवाड, सेक्शन इंजिनिअर धर्मेंद्रकुमार, सेक्शन इंजिनिअर आर. डी. सिंग, इंजिनिअर सुद्धांशूू कुमार, ज्युनियर इंजिनियर प्रगती पटेल,एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आदी उपस्थित होते..

नगर-मनमाड काम वर्षभरात होणार पूर्ण

तीन वर्षांपासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसर्‍या टप्प्यात नगर ते दौंडपर्यंत काम पूर्ण होणार आहे. गुरुवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. नगर ते मनमाड पर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागेल, असा अंदाज आहे.

हेही वाचा

Back to top button