बारावीच्या पहिल्याच इंग्रजीचा पेपरला पकडले 15 कॉपीबहाद्दर | पुढारी

बारावीच्या पहिल्याच इंग्रजीचा पेपरला पकडले 15 कॉपीबहाद्दर

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 110 केंद्रांवर बारावीची परीक्षा उत्साहात आणि तणावमुक्त वातावरणात सुरू झाली आहे. इंग्रजीचा पहिलाच पेपर होता. 64 हजार परीक्षार्थींनी हा पेपर दिला. तर 921 जणांची गैरहजेरी दिसली. दरम्यान, शहरातील काही केंद्रांवर परीक्षार्थींनी प्रवेश करताच त्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आल्याचे दिसले. अवघड इंग्रजीचा पेपर सोपा गेल्यानंतर काही केंद्रांवर पेपर संपल्यानंतर परीक्षार्थींनी हुश्श केल्याचे दिसले. आज गुरुवारी हिंदीचा पेपर होणार आहे.

जिल्ह्यातील 64 हजार विद्यार्थी 12 वीची परीक्षा देत आहेत. 110 केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाला सक्त सूचना केल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी कडूस यांनी तशी प्रत्येक केंद्रांवर व्यवस्था आणि उपाययोजनाही केल्याचे दिसले. जिल्ह्यात संवेदनशील 18 केंद्रावर पोलिसांचा फौजफाटाही तैनात होता. तसेच कॉपीमुक्त परीक्षेसाठी सात भरारी पथकेही वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देताना दिसले.

तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचेही पथके परीक्षा केंद्रांची पाहणी करताना दिसले. दरम्यान, इंग्रजीचा पेपर असल्याने कॉपी करणार्‍या 15 परीक्षार्थींवर कारवाई करण्यात आली. कर्जत, जामखेड आणि पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक पाच परीक्षार्थींवर ही कारवाई झाली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी कडूस यांनी कर्जत आणि जामखेडमध्ये स्वतः 10 कॉपीकेस केल्या. तर ‘योजना’चे शिक्षणाधिकारी संजय सरवदे यांनी पाथर्डीत पाच कारवाया केल्या आहेत. दरम्यान, परीक्षा सुरू होण्यापूर्वी शहरातील रेसिडेन्शीयलसह अन्य काही विद्यालयांनी परीक्षार्थींचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. त्यामुळे परीक्षार्थींच्या चेहर्‍यावरही उत्साह दिसून आला. तर पेपर संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर परीक्षार्थींनी झाला एकदाचा इंगजीचा पेपर, असे म्हणत सुस्कारा सोडल्याचे दिसले.

पाथर्डी पुन्हा हॉटस्पॉट?

बारावीच्या परीक्षा सुरू असताना कॉपी करून पेपर लिहिणार्‍या श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केंद्रातील दोन विद्यार्थी तर एमएम निर्‍हाळी विद्यालय केंद्रातील तीन अशा पाच विद्यार्थ्यांना रिश्टिकेट करण्यात आले आहे. प्रांताधिकारी प्रसाद मते, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश पालवे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, उप अभियंता उमेश केकाण, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांची भरारी पथके परीक्षा काळात भेटी देऊन परीक्षा केंद्राची तपासणी करत आहे.

हेही वाचा

Back to top button