कांदा निर्यातबंदीबाबत अपेक्षाभंग : पारनेर बाजार समितीत आंदोलन | पुढारी

कांदा निर्यातबंदीबाबत अपेक्षाभंग : पारनेर बाजार समितीत आंदोलन

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : कांदा निर्यात बंदीचा निर्णय 31 मार्च 2024 पर्यंत कायम ठेवण्यात आल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत.शेतकर्‍यांच्या आशेही पाणी फिरले आहे. याचा निषेध करण्यासाठी पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादकांनी आंदोलन केले. यावेळी व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना पाठिंबा दिला. व्यापारी शेतकर्‍यांचे शेतमालाला योग्य भाव देण्याचा प्रयत्न करतात. परंतु शासनाच्या निर्णयामुळे भावातील चढ-उतारामुळे व्यापार्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो, असे व्यापारी असोसिएशनतर्फे सांगून निषेध करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे यांनी केंद्र शासनाची भूमका नेहमी शेतकरीविरोधी असून, यापूर्वी ही आम्ही निर्यात बंदी उठविण्याबाबत मागणी केली.

पण शासनाने शेतकर्‍यांची फसवणूक केली असून, याबाबत शेतकर्‍यांनी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला नेहमीच बाजार समितीच्या संचालक मंडळाचा पाठिंबा राहील, असे जाहीर करण्यात आला. केंद्र शासनाने दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत निर्णय घेतल्याचे माध्यामातून वृत्त देण्यात आले. त्यामध्ये 3 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे कांदा उत्पादकांना थोडया प्रमाणात भाववाढीची अपेक्षा लागली होती. पण शासनाने या बाबत कोणतीही अधिकृत निर्णय अथवा नोटीफिकेशन काढले नाही. कोणत्याही शेतीमालाला सध्या कवडी मोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खर्‍या अर्थाने कर्जबाजारी झाला असून, आता आत्महत्येशिवाय शेतकर्‍यांपुढे पर्याय नसल्याचे तीव्र भावना शेतकर्‍यांमधून व्यक्त करण्यात आल्या.

हेही वाचा

Back to top button