महसूल अधिकार्‍यांना निवडणूक प्रशिक्षण : 96 अधिकार्‍यांचा समावेश | पुढारी

महसूल अधिकार्‍यांना निवडणूक प्रशिक्षण : 96 अधिकार्‍यांचा समावेश

नगर : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे 5 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागातील 96 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 12 महसूल अधिकार्‍यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगुल फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीची पूर्वतयारी सुरु आहे.

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना डिसेंबर महिन्यात नवी दिल्ली येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. नाशिक महसूल विभागात 48 तर छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात 48 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या दोन्ही विभागातील एकूण 96 अधिकार्‍यांसाठी 5 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजीनगरातील महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रियेबाबत पाच दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. निवडणूक आयोगाचे मास्टर ट्रेनर त्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ हे अहमदनगर तर अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी हे शिर्डी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्‍यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे 12 महसूल अधिकारी प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.

हेही वाचा

Back to top button