Dhule | प्रत्येक मतदाराचे मत अमूल्यच : विशाल बेनुस्कर | पुढारी

Dhule | प्रत्येक मतदाराचे मत अमूल्यच : विशाल बेनुस्कर

पिंपळनेर : (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा- मी मतदान केले नाही तर कुठे फरक पडतो असा नकारात्मक विचार लोकशाहीसाठी घातक ठरू शकतो व निवडणुकीत योग्य उमेदवार निवडून न दिल्याची खंत नेहमीच सतावत असते असे मत पिंपळनेर येथील विशाल रविंद्र बेनुस्कर यांनी व्यक्त केले. येथील कर्मवीर आ.मा.पाटील कला,वाणिज्य व कै.एन.के पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिरात ते बोलत होते.

पिंपळनेर वरिष्ठ महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीर वार्सा ता.साक्री येथील शासकीय आश्रमशाळेत संपन्न झाले. दुपार सत्रात ‘मतदार व मतदानाचे महत्व’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.एम.डी.माळी होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून अधिक्षिका एच.आर.ठाकरे, आर.आर.चौरे,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एल.जी गवळी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एन. तोरवणे, प्रा.डॉ.एन.बी. सोनवणे आदी होते.

पुढे बोलतांना विशाल बेनुस्कर म्हणाले की, निवडणुकीत केवळ एक मत कमी मिळाल्याने दिग्गज उमेदवार पराभूत झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. लोकशाही बळकटीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान अमूल्य आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. शासन मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदारांना मतदान करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करते. वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येकाने प्रथमतः आपली मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. तर प्रत्येक निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क आवर्जून बजावणे आपले कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. जर आपण मतदान केले नाही तर योग्य व सक्षम उमेदवार निवडणुकीत निवडून न आल्याची खंत आपल्या मनात सदैव खटकत असते. सक्षम व प्रबळ उमेदवार निवडून देण्यासाठी मतदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते ‘मी मतदान केले नाही तर कुठे फरक पडतो’ हा विचार मनातून काढून टाकत प्रत्येक मतदाराने मतदानासाठी पुढे आले पाहिजे असे अनमोल मार्गदर्शन विशाल बेनुस्कर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व शिबिरार्थी उपस्थित होते.

Back to top button