संगमनेर, कोपरगावात चिनी मांजा विकताना पाच जणांविरूद्ध गुन्हा | पुढारी

संगमनेर, कोपरगावात चिनी मांजा विकताना पाच जणांविरूद्ध गुन्हा

संगमनेर शहर/ कोपरगाव: पुढारी वृत्तसेवा: चायना मांजा विकणे, जवळ बाळगणे, त्याची विक्री करण्यावर बंदी आहे, मात्र हा नियम धाब्यावर बसवून मांजाची विक्री करताना व साठवताना संगमनेर शहरासह आश्वी व तळेगाव दिघे तर कोपरगावात पोलिस पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करीत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संगमनेरात जुबेर इब्राहिम अत्तार (वय 35 वर्षे, कुंभार आळा), मुजफर पापभाई तांबोळी (कोल्हेवाडी रोड, संगमनेर) व तालुक्यातील तळेगाव दिघे येथील शकील लतीफ आत्तार याच्या दुकानांची झाडा झडती घेत चिनी नायलॉन मांजा व रिळ आढळले.

कोब्रा गोल्ड, सुपर पावर, ओनो, मोटू-पतलू, मोनोकिंग फायटर नावाचा चिनी नायलॉन मांजा सापडला. 13, 600 रुपयांचे मांजाचे रीळ पोलिस पथकाने जप्त केले. दरम्यान, कोपरगाव शहरात दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोपरगावात हाजी हाबीब मणियार (वय 58 वर्षे, रा. जुनी कचेरी, गोसावी मठाजवळ, कोपरगाव) 1500 रुपयांचे नायलॉन मांजाचे दोन रिळ विकताना सापडला. ‘मोनो काईट’ नाव लिहिलेला नायलॉन मांजाची विक्री करताना त्याला पोलिसांनी रंगहात पकडला. याबाबत पोलिसांनी प्लॅस्टिक व पक्क्या धाग्यापासून बनवलेल्या मांजाच्या विक्रीमुळे पक्षांसह प्राणी व मानवाच्या जीवितास तीव्र ईजा होऊन अपघातात जीवित हानी होऊ शकते.

हे माहित असताना राज्य शासन निर्णयासह 3 जानेवारी 2019 रोजी काढलेल्या निर्देशाची अवज्ञा करण्यात आली. इतरांच्या जीविताची सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करताना तळेगाव दिघे व कोपरगावमध्ये दुकानात नायलॉन मांजाची विक्री करताना दोघे आढळले. डिवायएसपी सोमनाथ वाक्चौरे यांच्या आदेशानुसार संगमनेर, आश्वी व तळेगाव दिघे येथे नायलॉन मांजा जप्त करण्यात आला. संगमनेर पोलिस व कोपरगावचे पो. नि. प्रदीप देशमुख तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button