Yavtmal Accident : पोहरादेवीला नवस करण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; ६ ठार, १२ जखमी | पुढारी

Yavtmal Accident : पोहरादेवीला नवस करण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा अपघात; ६ ठार, १२ जखमी

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : पोहरादेवीचे नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला झालेल्या अपघातात ६ जण ठार, तर १२ जखमी झाले. ही घटना आज (दि.१६) दुपारी पुसद दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटात घडली. अॅपे वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. Yavatmal News

या अपघातामध्ये ज्योतीबाई नागा चव्हाण (वय ६०), उषा विष्णू राठोड (वय ५०, दोघेही रा. जवाहरनगर धुंदी), पार्वतीबाई रमेश जाधव (वय ५५, रा. वसंतपूर), वसराम देवसिंग चव्हाण (वय ६५, रा. सिंगरवाडी धानोरा), लिलाबाई वसराम चव्हाण (वय ६०, सिंगरवाडी धानोरा), सावित्रीबाई गणेश राठोड (वय ४५, जवाहरनगर धुंदी) हे सहा जण ठार झाले आहे. तर जखमींमध्ये राज राहुल चव्हाण (वय ५, रा. सेवानगर), आशा हूलसिंग चव्हाण (वय ५०, रा. सेवानगर), दर्शन संतोष पवार (वय ७, रा. सेवानगर), गणेश राठोड (रा. सेवानगर), प्रथमेश अर्जुन राठोड (वय ७, रा. पांढुर्णा), गाडी चालक ज्ञानेश्वर गणेश राठोड (वय २५) यांचा समावेश आहे.
पुसद तालुक्यातील जवाहरनगर धुंदी येथील गणेश लच्छीराम राठोड यांच्या घरी सर्वजण एकत्र आले. त्यानंतर सकाळी ११ ते ११:३० वाजताच्या सुमारास धुंदी येथून एमएच २९-३१७२ क्रमांकाच्या लाल रंगाच्या ॲपे वाहनातून जवळपास १८ जण नवस करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे जात होते. भरधाव वाहन वेगात जात असताना बेलगव्हाणजवळ चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने ही गाडी नाल्यात पलटी झाली. जखमींवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यातील प्रथमेश अर्जुन राठोड, राज राहुल चव्हाण यांना तातडीने नांदेड येथे रेफर करण्यात आले आहे. उपजिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आमदार इंद्रनील नाईक यांनी जखमींची व नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वना केली.

हेही वाचा 

Back to top button