शेअर बाजारातून नफ्याच्या आमिषाने 5 कोटींचा गंडा | पुढारी

शेअर बाजारातून नफ्याच्या आमिषाने 5 कोटींचा गंडा

श्रीरामपूर: पुढारी वृत्तसेवा: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास महिन्याला 10 ते 15 लाख रुपये नफा मिळेल, असे आमिष दाखवत पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून येथील एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शहरातील डावखर रोडवर मुश्ताक बनेमियाँ शेख यांचे फर्निचरचे दुकान व सॉ-मिलचा व्यवसाय होता. त्यांनी सॉ-मिल व जागेची विक्री केली होती. दरम्यान, मुश्ताक यांना जहागिरदारने ‘दरमहा 10 ते 15 लाख रुपये नफा मिळू शकतो. त्यातून तुमच्या बँकेचे व्याज परस्पर या पैशातून जाईल,’ असे आमिष दाखविले.

त्यातून जहागिरदारकडे मुश्ताक शेख व श्रीरामपूर, औरंगाबाद येथील अनेक व्यापारी व डॉक्टरांनी 35 ते 40 कोटी रुपये ठेव म्हणून गुंतवणूक केलेली आहे. तसेच आदिल यांचे वडील बाबूद्दिन याने, तुम्हाला पैसे न दिल्यास मी माझी शेती विकून तुम्हाला पैसे देईन, अशी हमी देत विश्वास संपादन केला. शेख यांनी सॉ मिल व जागा विक्रीतून आलेल्या रकमेतून 15 लाख रुपये जहागिरदारला 20 फेब्रुवारी 2023 रोजी दिले. या वेळी जहागिरदारने स्टॅम्प पेपरवर करारनामा व पाच लाखांचे तीन धनादेशही दिले. तीनच दिवसांत एक लाख रुपये रोख दिले. त्यामुळे त्यांच्यावरील विश्वास वाढला.

त्यानंतर 20 लाख रुपये 27 फेब्रुवारी 2023 रोजी घेतले. पुन्हा नोटरी करून दिली. नफा न दिल्यास मुद्दल वसुलीसाठी 5 लाखांचे प्रत्येकी चार धनादेशही दिले. स्टॅम्पही नोंदवला. शेख यांना काही दिवसांनी पाच लाख रुपये रोख दिले. त्यानंतर 24 एप्रिल 2023 रोजी शेख यांनी 50 लाख रुपये आरटीजीएसद्वारे जहागीरदारच्या खात्यावर पाठविले. शेख हे आरोपींच्या घरी पैसे मागायला गेले असता त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून पुन्हा पैसे मागितले तर ठार मारू, अशी धमकी दिली. शेख यांची 85 लाखांची फसवणूक केली.

दरम्यान, डॉ. अभिमन्यू उमाकांत माकणे (रा. ईश्वर हॉस्पीटल, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) यांचे 3 कोटी 20 लाख 58 हजार रुपये, आतिफ कूर रहेमान अब्दुल करीम शेख (रा.मिल्लतनगर, वॉर्ड क्र.2, श्रीरामपूर) यांचे 17 लाख 50 हजार, असरार आसीफ शेख (रा. वॉर्ड क्र. 2, श्रीरामपूर) यांचे 12 लाख 50 हजार आणि तौसिफ बालम पठाण (रा. गोपीनाथनगर, वॉर्ड क्र.2, श्रीरामपूर) यांचे 20 लाख अशी एकूण 5 कोटी 8 लाख रुपयांची फसवणूक जहागिरदार कुटुंबाने केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. आदिल बाबूद्दिन जहागिरदार, त्याची पत्नी, भाऊ इमान बाबूद्दीन जहागिरदार व वडील बाबूद्दिन जहागिरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

Back to top button