नागपूर : वेदमूर्ती गोविंदशास्त्री आर्वीकर यांचे निधन | पुढारी

नागपूर : वेदमूर्ती गोविंदशास्त्री आर्वीकर यांचे निधन

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ वेदविद्या पारंगत वेदमूर्ती गोविंदशास्त्री अंबादासपंत आर्वीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर वेदोक्त पद्धतीने मंत्राग्नीसह अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे बंधू हरिशास्त्री कृष्णशास्त्री, विष्णूशास्त्री, दामोदरशास्त्री ही मुले, मुलगी रेणुका भट्ट, सुना, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या महाल येथील निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. त्याचप्रमाणे अनेक मान्यवर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कारसमयी उपस्थित होते.

प्रकांड पंडित अंबादासपंत उपाख्य भाऊजी आर्वीकर यांचे ते सुपुत्र होत. संपूर्ण विदर्भात तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगढ या राज्यांमध्ये झालेल्या महायज्ञांचे पौरोहित्य त्यांनी केले. संस्कृत भाषेचा गाढा अभ्यास असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यांना कालिदास संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित केले होते. द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना धर्माचार्य उपाधी देऊन सन्मानित केले होते. त्यांनी १९८२- १९८३ या काळात महाल संघ कार्यालयासमोरील निवासस्थानी आर्वीकर वेदपाठशाळा स्थापन करून विद्यार्थ्यांना तयार केले.

या वेदपाठशाळेत राज्याच्या विविध भागातून तसेच कर्नाटक तसेच विदेशातील विद्यार्थी वेदाध्ययनासाठी येतात, मागीलवर्षी मॉरिशस येथील दोन विद्यार्थी या ठिकाणी वेदाध्ययन करीत आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील संत दादाजी मौनी महाराज यांच्या शिष्यवर्गाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता व चैतन्यकुटी येथे होणाऱ्या यज्ञविधीचे पौरोहित्य ते आपल्या चमूसह करीत असत.

हेही वाचा 

Back to top button