अबब… कारागृहामध्ये पथकास आढळले मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर | पुढारी

अबब... कारागृहामध्ये पथकास आढळले मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  तपासणीस आलेल्या पथकाला येथील उपकारागृहातील कैद्यांकडे मोबाईल, दोन बॅटरी, स्क्रू ड्रायव्हर, सिगारेट पाकीट व तंबाखूच्या पुड्या आढळल्या. दरम्यान, कैद्यांकडे शस्त्र वा हत्यार सापडले नसल्याचे सांगण्यात आले. शहर पोलिस ठाण्याच्या आवारातील उपकारागृहातून 4 कैदी गार्ड ड्यूटीवरील कर्मचार्‍यांना दमबाजी करीत शस्त्राचा धाक दाखवित कारागृहाचे गज कापून पसार झाले होते. यानंतरसुद्धा गार्ड पोलिस कर्मचार्‍यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणे, ठार मारण्याची धमकी देणे, जेवणाचे ताट फेकून मारणे, एवढेच नव्हे तर थेट बराकीत वाढदिवस साजरा करणे, यासारखे गंभीर प्रकार घडले होते.

संबंधित बातम्या :

याबाबत उपकारागृहाची जबाबदारी असलेले तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाक्चौरे व पो. नि. भगवान मथुरे यांनी लेखी तक्रार केली होती. उपकारागृहात वारंवार होणारे हे प्रकार सहन करण्यापलिकडे गेले होते. यामुळे गार्ड कर्मचार्‍यांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केल्या होत्या. या गंभीर प्रकरणी पोलिस उपाधिक्षक वाक्चौरे यांनी दखल घेतली. उपकारागृहामध्ये कैद्यांनी काही शस्त्र लपवून ठेवली की काय, हे तपासण्यास सशस्त्र पथकास पाचारण केले. पथकाने उपकारागृहाची तपासणी केली असता, न्यायालयीन कोठडीतील 50 पुरुष, 4 महिला तर पोलिस कोठडीत 1 पुरुष असे 55 कैदी पथकास तपासणी करताना आढळले.

‘संगमनेर येथील उपकारागृहात कैद्यांनी काही शस्त्र लपवून ठेवली आहेत की काय, याची खातरजमा करताना सशस्त्र पथकाला मोबाईल, दोन बॅटरी, स्क्रू ड्रायव्हर, सिगारेट पाकीट व तंबाखूच्या पुड्या आढळल्या. कारागृहात गेले की, कुठलीही वस्तू कायद्याला तेथे नेता येत नाही, मात्र या वस्तू तेथे कशा गेल्या, याची चौकशी केली जाईल. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
                            -पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाक्चौरे, संगमनेर विभाग

Back to top button