Crime news : चोरट्यांच्या मारहाणीत चौघे जखमी | पुढारी

Crime news : चोरट्यांच्या मारहाणीत चौघे जखमी

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  आखेगाव येथे दोन ठिकाणी चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत एका महिलेसह चार जण जखमी झाले. रविवारी पहाटे धुमाकूळ घालत चोरट्यांनी 50 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. यामुळे आखेगाव परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. आखेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे राहणारे अभय राधाकिसन पायघन हे कुटुंबियासह घरात झोपलेले असताना, रविवारी पहाटे सव्वाच्या सुमारास त्यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांच्या आई मंगल पायघन याना झोपेतून जाग आल्याने त्या किंचाळल्या. त्यावेळी चोरांनी त्यांना आरडाओरडा करू नकोस, नाहीतर मारून टाकू, अशी धमकी दिली व हातातील शस्त्राने डोळ्याजवळ मारहाण करून जखमी केले.

त्याचवेळी वडील राधाकिसन पायघन यांनी देखील विरोध केला असता, त्यांनाही लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर चोरट्यांनी किचनच्या डब्यात ठेवलेले 10 हजार रूपये काढून घेतले. आरडाओरडा झाल्यामुळे चोरट्यांनी घरातून काढता पाय घेतला. त्यांचा पाठलाग करीत अभय पायघन मागे धावले असता, चोरट्यांनी दगडफेक केली. त्यानंतर चोरट्यांनी सोमठाणा रोडवर शेतवस्तीत राहणारे रामकिसन पांडू काटे यांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा हात मोडला. चोरट्यांनी तेथून 40 हजार रूपये लांबविले. रामकिसन काटे यांना मारहाण करताना पाहिल्यावर त्यांची पत्नी सुशीला काटे यांनी आरडाओरड सुरू केला. परंतु, चोरट्यांनी त्यांना गप्प बसण्यास सांगितले.

यावेळी शेजारी राहणारे भाऊसाहेब काटे व ज्ञानेश्वर पालवे हे बाहेर येताच चोरट्यांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. नितीन पायघन व सारथीबाई गोर्डे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला. अभय राधाकिसन पायघन यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात तीन व्यक्तींविरोधात पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दीपक सरोदे करीत आहेत.

 

Back to top button