

चिचोंडी शिराळ : पुढारी वृत्तसेवा : मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या नवीन पाईपलाईनचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी काही ठिकाणी डुप्लिकेट पाईपचा वापर होत असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रफिक शेख यांनी केला आहे. या विरोधात परिसरातील विविध गावच्या सरपंचासह पांढरीचा पूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पाथर्डी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी ही योजना आहे. मात्र, या कामात काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क असलेले पाईप वापरले जात आहेत, तर काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क नसलेले वेल्डिंगने जोडलेले पाईप वापरले जात आहेत. ठेकेदाराकडून काही ठिकाणी डुप्लिकेट पाईपचा वापर केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
शिराळ, पांढरीचा पूल या भागात या नवीन पाईपलाईनसाठी लोखंडी पाईप वापरून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराकडून काही ठिकाणी आयएसआय ट्रेडमार्क नसलेले पाईप वापरले जात असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. अशा पद्धतीने लाभधारक गावांच्या डोळ्यात धूळफेक करण्याच काम होणार असेल, तर हे काम तात्काळ थांबविण्यात यावे. शासनाचा एवढा मोठा निधी वाया जाऊन लाभधारक गावांना कधीही नियमित पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे, याचा जाब विचारण्यासाठी या योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या विविध गावच्या सरपंचांसह पांढरीचा पूल या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.
हेही वाचा :