विद्यार्थ्यांना अंडी खरेदीसाठी सव्वा कोटी ! | पुढारी

विद्यार्थ्यांना अंडी खरेदीसाठी सव्वा कोटी !

नगर :  पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण अंतर्गत शालेय मुलांना अंडी, केळी खरेदीसाठी झेडपीच्या 4540 शाळांना पहिल्या सहा आठवड्यांसाठी 1 कोटी 30 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रतिविद्यार्थी 5 रुपये असा सहा आठवड्यांसाठी विद्यार्थीनिहाय 30 रुपयांप्रमाणे शाळांना हा निधी वर्ग केला जात आहे. दरम्यान, शासनाने दिलेल्या पाच रुपयांत अंडी भेटत नसल्याने अनेक शाळांनी सरसकट केळी वाटपावरच भर दिल्याचे समजते. जिल्ह्यात झेडपीच्या 4540 शाळा आणि 4 लाख 57 हजार 192 विद्यार्थी आहेत.

या विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्याच्या निधीतून आठवड्यातून एक दिवस अंडी, तसेच अंडी न खाणार्‍यांना केळी, किंवा अन्य फळे हा पोषक आहार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची सुरुवात नोव्हेंबरमध्येच झाली. या शासन निर्णयानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला पोषक आहारासाठी पाच रुपये निधी मिळणार आहे. मात्र या पाच रुपये दराने कोठेही अंडी मिळत नाहीत, त्यामुळे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीने पदरमोड करण्यापेक्षा केळी वाटपाचा सुलभ मार्ग निवडला आहे. अनेक शाळांत अशाप्रकारे केळीवाटप केली जात आहेत. काही मोजक्या शाळांमध्ये आजही अंडी बिर्याणी शिजवली जात असल्याचे समजते. दरम्यान, शासनाने पहिल्या सहा आठवड्यांचा निधी अ‍ॅडव्हान्स म्हणून देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यासाठी 1 कोटी 30 लाखांचा निधी मिळाला आहे. आता शिक्षकांनी उधारीवर घेतलेली अंडी, केळीचे पैसे परत करता येणार आहेत.

 शासनाच्या प्राप्त निधीतून प्रतिविद्यार्थी पाच रुपये अर्थात सहा आठवड्यांचे 30 रुपये असे वाटप प्रमाण आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने तालुकानिहाय मागणीपत्र मागविले आहे. त्यात विद्यार्थी संख्या आणि सहा आठवड्यांसाठी आवश्यक रकमेचा तपशील आहे. आतापर्यंत सात तालुक्यांचेच अहवाल झेडपीत आलेले आहेत.

हेही वाचा :

Back to top button