

नगर तालुका : गेल्या दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. पावसाळ्यात वरूणराजाने फिरविलेली पाठ, नंतर अवकाळीचा फटका, धुके अन् त्यातच आता रानडुकरांचा उच्छाद, यामुळे नगर तालुक्यातील शेतकर्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला. त्याची भरपाई चालू वर्षी होईल, या अपेक्षेवर शेतकर्यांनी कर्ज, उसनवारी करत शेतीची मशागत करून खरीप हंगामात बाजरी, मूग, सोयाबीनची पेरणी केली. परंतु, पावसाने निराशा केल्याने खरीप हंगामात शेतकर्यांच्या पदरी उत्पन्नच आले नाही.
संबंधित बातम्या :
झालेला खर्च देखील वसूल झाला नाही. उत्तरा नक्षत्रात झालेल्या कमी-अधिक पावसावर शेतकर्यांनी पुन्हा नव्या उमेदीने रब्बी हंगामाची तयारी केली.पावसाच्या अपेक्षेवर कांदा, गहू, ज्वारी, हरभरा, चारा पिकांची 80 टक्के पेरणी झाली. अनेक भागात डिसेंबरमध्येच पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने रब्बी पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यातच मागील आठवड्यात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या कांद्याचा चिखल केला. ढगाळ हवामान, तसेच धुक्यामुळे सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. महागड्या औषधांची फवारणी करून देखील पाण्याअभावी उत्पन्न हाती लागेल, याची शाश्वती नाही. अशी दयनीय परिस्थिती तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
जिरायत पट्ट्यातील ज्वारी, मका व इतर चारा पिकांसाठी अवकाळी पावसाने नवसंजीवनी मिळाली. डोंगरदर्या हिरव्यागार झाल्याने चार्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. परंतु, ज्वारी, मका व इतर चारा पिकांसाठी रानडुकरे कर्दनकाळ ठरत आहेत. रानडुकरांकडून ज्वारी, मका पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी सुरू आहे. तालुक्यात वन विभागाच्या वतीने केलेल्या पाहणीत सर्वाधिक रानडुकरांची संख्या आढळून आली होती.
जेऊर, ससेवाडी, वाळकी, इमामपूर, बहिरवाडी पट्ट्यातील ज्वारी, मका पिकांचे रानडुकरांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. काढणीला आलेला कांदा अवकाळी पावसामुळे शेतात सडणार आहे. तर, गहू, हरभरा, नवीन लागवड केलेल्या कांदा लसूण पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यातील बहुतांशी नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असून, जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. शेतीतून उत्पन्न नाही, जनावरांच्या चार्याचा प्रश्न, दुधाला भाव नाही, यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. याचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर झालेला दिसून येत आहे. तालुक्यातील आर्थिक व्यवहार मंदावले असून, शेतकर्यांमुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्थेची घडी विस्कळीत झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
केवळ नुकसानीचे पंचनामे न करता तात्काळ आर्थिक मदत मिळावी. अनेकांना मागील वर्षीच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अद्याप मदत मिळालेली नाही. – संतोष गावखरे, शेतकरी, चास.