Nagar : कुकडीचे आवर्तन आजपासून ; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश | पुढारी

Nagar : कुकडीचे आवर्तन आजपासून ; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : कर्जत-जामखेड तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणार्‍या कुकडी धरणाचे आवर्तन आज (दि.5) सोडले जाणार आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने 15 डिसेंबर रोजी सुटणारे आवर्तन 10 दिवस अगोदरच सुटणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतीला आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीला आमदार रोहित पवार उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कुकडीच्या पाण्याचे योग्य नियोजन करून लवकरात लवकर आवर्तन सोडावे, अशी मागणी आमदार पवार यांनी केली होती.

तसेच, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस न झाल्यास कुकडीचे 15 डिसेंबर रोजी सुटणारे आवर्तन 15 ते 20 दिवस अगोदरच सोडण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्याप्रमाणे अजित पवार यांनी संबंधित अधिकार्‍यांना आदेश दिले होते. परंतु, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले.

दरम्यान, आमदार पवार यांनी 16 ऑक्टोबर रोजी अजित पवार यांना पत्र लिहून कुकडी प्रकल्पाचे रब्बी हंगामातील आवर्तन 25 नोव्हेंबर रोजी सोडावे, अशी विनंती केली. त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना भेटून तशी मागणी कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाकडे आपल्या स्तरावरून करावी, अशी विनंती केली. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता 10 दिवस अगोदरच कुकडीचे आवर्तन सोडले जाणार आहे. यामुळे कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणार्‍या 54 गावांतील शेतकर्‍यांची आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.

हेही वाचा :

 

Back to top button