भिंगार चार महिन्यांत येईल महापालिकेत : खासदार डॉ. सुजय विखे

भिंगार चार महिन्यांत येईल महापालिकेत :  खासदार डॉ. सुजय विखे

नगर : पुढारी वृत्तसेवा :  भिंगार शहराचा अहमदनगर महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मी आणि आमदार संग्राम जगताप, आम्ही दोघांनी यापूर्वीच घेतलेला आहे. भिंगारच्या जनतेनेही सहभागी होण्यास संमती दिली आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा अधिवेशनात हा विषय मांडून परवानगी घेतली जाईल. त्यामुळे येत्या चार-पाच महिन्यांत भिंगार शहराचा महापालिकेत समावेश होईल, अशी ग्वाही खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी रविवारी दिली. भिंगारचा समावेेश केल्यास शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यास प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी दिले. महापालिकेत सहभागी होण्यास तयार असल्याचा ठराव पारित करण्यात आला.

संबंधित बातम्या :

भिंगार शहरातील जनतेला छावणी मंडळाकडून मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. मध्यंतरी केंद्र सरकारने छावणी मंडळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत रविवारी खासदार डॉ. विखे आणि आमदार जगताप यांनी बैठक घेतली. भिंगारच्या नागरिकांसह महापालिका आयुक्त पंकज जावळे, भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, शिवसेना (शिंदे) जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी भिंगारच्या नागरिकांनी रस्ते, खड्डे, पाणीपुरवठा, आरोग्य आदींबीबत प्रश्न उपस्थित केले. ते छावणी मंडळाकडून सुटत नाहीत, छावणीतून सुटका करा, आमच्या समस्या सोडवा, भिंगारला महापालिकेत घ्या. विकासकामे मार्गी लावण्यासाठी या शहराला कोणी दत्तक घेणार आहे की नाही. की फक्त मतदानासाठी जनतेचा उपयोग केला जात आहे? असा सवाल नागरिकांनी केला. विकासकामांसाठी आमदार निधीतून दोन-तीन कोटींची कामे करण्यास तयार झालो होतो. मात्र छावणी मंडळाने परवानगी दिली नाही. भिंगार येथील छावणी मंडळ राज संपवा, अशी विनंती आमदार जगताप यांनी खासदार विखे यांच्याकडे केली. येथील प्रश्न सुटल्यास देशभरातील 72 छावणी मंडळांचे प्रश्न सुटतील. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भिंगारला मनपात सहभागी होण्यास कोणाची हरकत नाही. मात्र, मध्यंतरी 12 गावांचा समावेश झाला, तरीही मूलभूत सुविधा व इतर विकासकामांसाठी शासनाकडून महापालिकेला एकही पैसा मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार डॉ. विखे म्हणाले, की डिसेंबरमध्ये लोकसभा आणि विधानसभेचे अधिवेशन आहे. आमदार जगताप विधानसभेत आणि मी लोकसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार आहे. राज्य शासनाकडून सहभागी करण्याचा प्रस्ताव मिळविला जाईल. संरक्षणमंत्री व इतरांकडून संमती मिळविली जाणार आहे. सध्या नगर छावणी मंडळाचा कारभार बोगस आहे. जनतेला त्यांच्या तावडीतून सोडवणार आहोत. त्यामुळे येत्या चार-पाच महिन्यांत भिंगारला महापालिकेत समावेश करून घेतले जाईल.

सातशे ते आठशे कोटींचा प्रस्ताव पाठवा
यापूर्वी महापालिकेत 12 गावे समाविष्ट केली. मात्र, कोणी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे नेला नाही. त्यामुळे ही गावे अद्याप विकासकामे आणि सुविधांपासून वंचित असल्याचा आरोप शिवसेना (शिंदे) जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांनी केला. भिंगारचा समावेश केल्यास 700 ते 800 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा तरच समावेश झालेल्या जनतेला सुविधा देता येतील, असे त्यांनी नमूद केले.

महापालिका सक्षम आहे का? : वारे
महापालिकेत सहभागी वसाहतींना निधीअभावी सवलती देता येत नाहीत. भिंगारचा समावेश केल्यास त्यांना सुविधा देण्यास महापालिका सक्षम आहे का? असा सवाल नगरसेवक निखील वारे यांनी उपस्थित केला. समस्या आणि सुविधांबाबत नगर शहरातील नागरिकांचे दुखणेदेखील ऐकून घ्यावे, यासाठी अशीच एक बैठक आयोजित करा. वाढीव हद्दीसाठी निधीदेखील वाढवा, अशी मागणी त्यांनी केली.

महापालिकेत फार सुविधा मिळतील, या भ्रमात राहू नका; पण…
भिंगारच्या नागरिकांनी मांडलेल्या समस्यांबाबत बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, की डिसेंबर 2020 पासून भिंगारला महापालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया हाती घेतली. मात्र, मध्यंतरी कोरोनामुळे काम थांबले होते. चार-पाच महिन्यांपासून मी आणि खासदार विखे पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नागरिकांचे महापालिकेत सहभागी होण्याबाबतचे मत जाणून घेण्यासाठी आज बैठक बोलावली. छावणी मंडळात आज जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती महापालिकेची आहे. महापालिकेत फार सुविधा उपलब्ध होतील, अशा भ्रमात राहू नका. पण छावणी मंडळाचा कारभार हुकूमशाहीचा आहे आणि महापालिकेत लोकशाही. तुम्हाला तुमचे प्रश्न मांडण्याची आणि सोडविण्याची संधी असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news