Nagar : अरुण मुंढेंविरुद्ध मुरूम उत्खननाचा गुन्हा नोंदवा | पुढारी

Nagar : अरुण मुंढेंविरुद्ध मुरूम उत्खननाचा गुन्हा नोंदवा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  विनापरवाना मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान राज्य चिटणीस अरुण मुंढे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा चंद्रकांत चेडे यांनी शेवगावच्या तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत माहिती अशी ः शेवगाव तालुक्यातील चेडेचांदगाव येथील चंद्रकांत चेडे यांनी त्यांच्या गट नं. 28 या जमिनीतून अरुण मुंढे व उदय मुंढे यांनी विनापरवाना मुरूम उत्खनन केल्याची तक्रार तेथील तहसीलदारांकडे काही दिवसांपूर्वी केली होती. तक्रारीनंतर 18 स्पटेंबर रोजी अंदाजे 20 ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा पंचनामा केला होता.

तदनंतर पोलिस निरीक्षक यांच्याकडे चोरीचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली. पुढे 25 सप्टेंबरला चंद्रकांत चेडे व नंदकुमार मुंढे, शिवाजी चेडे, श्रीराम चेडे, प्रभाकर चेडे, परमेश्वर चेडे यांनी 5 स्पटेंबर रोजी दिलेल्या तक्रारींचा तलाठी यांनी चंद्रकांत चेडे यांच्या जमिनीतील 20 ब्रास मुरमाचा पंचनामा केला; परंतु पुढे इतर लोकांचा पंचनामा झाला नाही. अरुण मुंढे यांनी पदाचा गैरवापर करून माझ्या जमिनीतील विना रॉयल्टी 4 हजार ब्रासचे उत्खनन करून मोठे नुकसान केले व जिवे मारण्याची धमकी दिली. तरी उर्वरित पंचनामा न झाल्यास महसूलमंत्र्यांसमोर बैलगाडी व मुलाबाळांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.

मात्र याबाबत अद्याप कुठलीच कारवाई झाली नसल्याने चंद्रकांत चेडे यांनी आता गट नं. 28 मधून मुंढे बंधूंनी मुरूम चोरून नेला आहे, त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. जमिनीच्या उत्खननाने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अरुण मुंढे व उदय मुंढे यांनी दमदाटी करून जेसीबी तसेच वाहनाच्या साह्याने मुरूम चोरून नेला आहे. वेळोवेळी अर्ज करून कारवाई झाली नाही अथवा वाहने जप्त केली नाहीत. याबाबत कारवाई करण्यात यावी तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करून द्यावी अन्यथा 11 डिसेंबर पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा :

Back to top button