

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीवर जाऊन शोलेस्टाईल निषेध आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. यासंदर्भात महिलांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन दिले आहे. सुमारे पन्नास हजार लोकवस्तीच्या शेवगाव शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. येथे दिवसाआड पाणी मिळावे व खास शहरासाठी मंजूर असलेल्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी आहे. नगरपरिषदेने छत्रपती संभाजीनगरच्या एका नामांकित संस्थेस सुमारे पाच महिन्यांपूर्वी दिलेले काम अद्याप सुरू केले नाही. त्या कामास गती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शहरात अनेक वर्षांपासून कधी बारा तर, कधी पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे महिलांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सध्याची पाण्याची पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली आहे. अनेकदा गटारीचे पाणी पाईपलाईनमध्ये उतरून हेच पाणी पिण्यास येत असल्याने साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. यासाठी नगरपरिषदेच्या स्तरावरून योग्य ती सुधारणा व्हावी, शहरात दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा व शेवगावकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बाबत दिलासा मिळावा. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास तर 4 डिसेंबर रोजी शहरातील भूमी अभिलेख कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर जाऊन महिलांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी स्नेहल फुंदे, सीमा बोरूडे, जयश्री काथवटे, शोभा शिनगारे, बालिका फुंदे, स्विटी शिनगारे, मीना काथवटे, सविता धनवट, मोना शिनगारे आदींसह अनेक महिला उपस्थित होत्या.
हेही वाचा :