

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोराची धडक होऊन यामध्ये जालिंदर जयसिंग काळे (वय 51, रा. काष्टी, ता श्रीगोंदा) हे जागीच मयत झाले. त्यांचे सहकारी रामदास कोळेकर हे किरकोळ जखमी झाले आहेत. चाकण-बीड महामार्गावर काष्टी-न्हावरा रस्त्यावर इनामगाव नजीक हा अपघात झाला. जालिंदर काळे व रामदास कोळेकर हे दोघे मित्र कामानिमित्त न्हावरा (ता. शिरुर) येथे गेले होते. सायंकाळी घरी येत असताना, काळे यांच्या मोटारसयकलीला समोरून येणार्या अज्ञात मोटारसायकल चालकाने जोराची धडक दिली. यामध्ये जालिंदर काळे हे गंभीर जखमी झाले. तर कोळेकर हे किरकोळ जखमी झाले.
त्यांना काष्टी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी जालिंदर काळे यांना मयत घोषित केले. अपघातानंतर मोटारसायकल चालक पळून गेला. मयत काळे यांचे शिरुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन दि.27 रोजी सकाळी दहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. मयत काळे यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. काष्टी येथील व्यापारी मच्छिंद्र उर्फ आबा काळे यांचे धाकटे बंधू, तर मेजर राजेंद्र काळे यांचे चुलत बंधू होते. याप्रकरणी मच्छिंद्र जयसिंग काळे यांच्या फिर्यादीवरून मांडवगण फराटा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा :