

अकोले : पुढारी वृत्तसेवा : दुधाला 34 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी अकोले येथे आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान, सरकारने तब्बल 4 दिवस उलटूनही या उपोषणकडे दुर्लक्ष केल्याने संदीप दराडे व अंकुश शेटे यांनी सुरू केलेल्या या उपोषणात बेमुदत अन्नत्याग करीत डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेतला आहे. दुधाचे दर कोसळल्याने महाराष्ट्रभरातील शेतकरी हवालदिल झाले. सरकारने आदेश देऊनही सहकारी व खासगी दूध संघांनी हा आदेश पाळण्यास (दि. 22 नोव्हेंबर) रोजी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत नकार दिला.
अकोले येथे सुरू असलेल्या उपोषणास राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. राज्य सरकारने तातडीने या प्रश्नात ठोस तोडगा काढावा, असे आवाहन दूध उत्पादकांनी केले आहे. उपोषणास शेकडो ग्रामपंचायती व दूध संकलन केंद्रांनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. आंदोलनस्थळी सर्व राजकीय पक्षांचे नेते, आजी, माजी आमदार व खासदारांनी भेट देत पाठिंबा दिला आहे. दुधाला 34 रुपये भाव मिळत नाही, दूध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटामारी, खासगी संस्थांना लागू असणारा कायदा आदी प्रश्नी कार्यवाही केल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी जाहीर केला.
मिलिंद नाईकवाडी, डॉ. मोहन पवार, तुळशीराम कातोरे, महेश सोनवणे, राम एखंडे, शुभम आंबरे, भीमाशंकर मालूंजकर, सुनील लोखंडे, नितीन डुंबरे, निलेश गवांदे, दीपक पथवे, संदीप शेणकर, राहुल शेटे, किशोर शिंदे, सत्यम भोर, अतुल लोहटे, संतोष भोर, राजेंद्र भोर, माणिक पांडे, नानासाहेब धुमाळ आदी या आंदोलनाचे संचालन करीत आहेत.
उपोषण न सोडण्याचा ठाम निर्धार..!
दुधाला 34 रुपये भाव मिळत नाही, दूध भेसळ, वजन व मिल्कोमीटर काटामारी, खासगी संस्थांना लागू असणारा कायद्याबाबत निर्णय झाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा ठाम निर्धार करण्यात आला.
हेही वाचा :