धक्कादायक ! तहसीलदारांच्या अंगावर घातला डंपर | पुढारी

धक्कादायक ! तहसीलदारांच्या अंगावर घातला डंपर

शेवगाव तालुका : पुढारी वृत्तसेवा :  वाळू तस्कराने तहसीलदारांच्या वाहनाला धडक देऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि. 21) रात्री अमरापूर बसस्थानक चौकात घडली. याबाबत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना अमरापूरनजीक चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने ते मंगळवारी रात्री आठच्या सुमारास त्यांच्या खासगी कारमधून (एमएच 35 पी 6865) गेले. वाळूच्या वाहनांवर कारवाईसाठी ते अमरापूर बसस्थानक चौकात थांबले होते. त्या वेळी तिसगावमार्गे जाणारा क्रमांक नसलेला डंपर त्यांनी काही अंतरावर पाठलाग करून पकडला. त्यात विनापरवाना वाळू भरलेली होती.

संबंधित बातम्या :

या कारवाईच्या मदतीसाठी तहसीलदारांनी अमरापूर येथे राहणारे पोलिस हवालदार बाबासाहेब गरड यांना बोलावले. त्याच काळात तेथे पांढर्‍या रंगाची जीप (एमएच 16 सीव्ही 2313) येऊन थांबली. त्या वेळी डंपरचालकाने मालक जीपमध्ये असल्याचे सांगितले.
याबाबत तहसीलदारांनी चौकशी सुरू केली असता जीपमधील व्यक्तीने डंपर चालकास पळून जाण्याचा इशारा केला. त्यामुळे सुसाट निघालेल्या डंपरने तहसीलदारांच्या खासगी वाहनाला धडक देऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांनी सावधगिरीने बाजूला उडी मारल्याने ते बचावले. डंपर मात्र न थांबता निघून गेला. जीपमधील चालक-मालक वाहन तेथेच सोडून पळून गेले. तहसीलदार सांगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपरचालक अन्वर पठाण (पूर्ण नाव, पत्ता समजला नाही) व जीपचालक (नाव, पत्ता समजला नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button