Nagar : ‘पिंपळगाव खांड’ साठी आता 117.45 कोटी | पुढारी

Nagar : ‘पिंपळगाव खांड’ साठी आता 117.45 कोटी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी 117 कोटी 45 लाख रुपये खर्चाच्या कामास व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या किंमतीत प्रकल्प पूर्ण करावा तसेच अनावश्यक खर्च होणार नाही, याचे पालन करण्याचे निर्देश राज्य शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला दिले आहेत. पिंपळगाव खांड प्रकल्प गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील डोंगरी क्षेत्रात असून, मुळा नदीवर बांधण्यात आलेला आहे. या प्रकल्पाचा पाणीसाठा 16.992 दलघमी इतका असून, यातून अकोले तालुक्यातील 1 हजार 303 व संगमनेर तालुक्यातील 475 असे एकूण 1 हजार 778 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. या प्रकल्पास 2008-9 या वर्षात 44 कोटी 59 लाख रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

त्यानंतर 1 जुलै 2017 मध्ये पुन्हा 101 कोटी 5 लाख रुपये खर्चाच्या कामास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
9 फेब्रुवारी 2023 रोजी प्रकल्पाबाबत राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती 187 वी बैठक झाली होती. त्यात प्रकल्पासाठी 117 कोटी 45 लाख रुपये किमतीच्या व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी अशी शिफारस शासनाकडे करण्यात आली होती. प्रकल्प लाभव्यय गुणोत्तर, पाणी साठ्याची प्रतिसघमी किंमत तसेच अतंर्गतआर्थिक परतावा दराच्या मापदंडात बसतो. त्यामुळे या प्रकल्पाची दरसूची 2022-23 वर आधारित 117 कोटी 45 लाख इतक्या किमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास नियोजन व वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली. 117 कोटी 45 लाख रुपयांची सुधारित मान्यता दिल्याचा अध्यादेश 20 नोव्हेंबर 2023 रोजी जारी केला आहे. यामध्ये निव्वळ कामांसाठी 115 कोटी 63 लाख रुपये खर्च करा आणि उर्वरित 1 कोटी 82 लाख रुपये अनुषंगिक खर्चासाठी असणार असल्याचे शासनाने अध्यादेशात म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button