Nagar News : दुष्काळप्रश्नी न्यायालयाचे दरवाजे ठोठवू : आमदार नीलेश लंके | पुढारी

Nagar News : दुष्काळप्रश्नी न्यायालयाचे दरवाजे ठोठवू : आमदार नीलेश लंके

पारनेर : पुढारी वृत्तसेवा :  दुष्काळी स्थिती असतानाही दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत नगर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश नाही. या प्रश्नावर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठवू, असा इशारा आमदार नीलेश लंके यांनी दिला. जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर आमदार लंके यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आढावा घ्यावा. पारनेर-नगर मतदारसंघासह पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, राहुरी, नगर तालुका या तालुक्यातील टंचाईची स्थिती भीषण असल्याचे आमदार लंके यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर कृषी व महसूल विभागाची संयुक्त बैठक घेऊन आपण शासनास अहवाल पाठवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिली.

संबंधित बातम्या :

जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आमदार लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्याच्या इतर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात येत असताना, नगर जिल्ह्यावर अन्याय होत आहे. त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या दुष्काळी स्थितीची वस्तुस्थिती त्यांच्यापुढे मांडणार आहोत. त्यानंतरही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास सर्व माहितीचे संकलन करून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करून जिल्ह्यासाठी दुष्काळी उपाययोजना पदरात पाडू घेऊ, असे आमदार लंके यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील बहुतांश तलाव, बंधारे, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांच्यात पाणीसाठा नाही. लवकरच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार असून, त्यासाठी टँकर भरायचे कुठे, असाही प्रश्न निर्माण होणार असल्याचे लंके यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी अ‍ॅड. राहुल झावरे, शिवाजी होळकर, सुनील कोकरे, प्रवीण वारूळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारीही झाले आवाक
आमदार नीलेश लंके हे जिल्हाधिकार्‍यांच्या भेटीस गेले त्यावेळी त्यांच्याकडे टंचाईसंदर्भात इत्यंभूत माहिती होती. ही माहिती पाहून जिल्हाधिकारी सालीमठही आवाक् झाले. ही माहिती कुठून संकलित केली, अशी विचारणाही जिल्हाधिकार्‍यांनी आमदार लंके यांच्याकडे केली.

Back to top button