केळीच्या पानात जेवण्याचे ‘हे’ आहेत बहुसंख्य फायदे | पुढारी

केळीच्या पानात जेवण्याचे ‘हे’ आहेत बहुसंख्य फायदे

बंगळुरू : आपल्या देशात प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढले जाते. ही पारंपरिक पद्धत कित्येक शतकांपासून चालत आली आहे. मात्र, केळीच्या पानांचा वापर जेवणासाठी केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळतात.

यातील पहिला फायदा म्हणजे केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. जेव्हा केळीच्या पानावर अन्न ठेवले जाते, तेव्हा त्यातील काही पोषक घटक अन्नामध्ये मिसळतात, ज्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढते. दुसरा फायदा म्हणजे, केळीच्या पानांवरील पदार्थ खाल्ल्यामुळे जेवणाची लज्जत वाढते. ही पाने अन्नाला मातीची चव देतात. त्यामुळे अन्नाची चव वाढते. तिसरा फायदा म्हणजेे, केळीच्या पानावर जेवल्यामुळे अन्नाला पारंपरिक आकर्षण प्राप्त होते.

तुम्ही मनापासून अन्न खाल्ले तर आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात. चौथा फायदा म्हणजे, प्लास्टिक किंवा थर्माकोल प्लेटस्च्या तुलनेत केळीची पाने विषारी नसतात. परिणामी, हानिकारक रसायने अन्नामध्ये मिसळत नाहीत. यामुळे विविध रोगांचा धोका कमी होतो. पाचवा फायदा म्हणजे, केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्यामुळे पचनक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो. केळीच्या पानांमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल पाचक एन्झाईम्सचे उत्पादन वाढवतात. ते चांगले पचन आणि पोषक तत्त्वांचे शोषण करण्यास मदत करतात.

सहावा फायदा म्हणजे, केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात. ते अन्नातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करतात. त्यामुळे केळीच्या पानांवर अन्न खाल्ल्याने अन्नजन्य रोगांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. सातवा फायदा म्हणजे, डिस्पोजेबल प्लेटस्ला नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानांचा वापर करणे हा पर्यावरणपूरक उपाय आहे. यामुळे प्लास्टिक किंवा फोम प्लेटस्ची गरज कमी होते. आठवा आणि अंतिम फायदा म्हणजे, केळीची पाने जैवविघटनशील असतात. याचा अर्थ असा की, पर्यावरणाला कसलीही हानी न पोहोचवता ती सहजपणे नष्ट होतात. यामुळे जेवण वाढण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

Back to top button