नगर झेडपीच्या बंधार्‍यात झिरपणार चार कोटी ! | पुढारी

नगर झेडपीच्या बंधार्‍यात झिरपणार चार कोटी !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेतून चार कोटींच्या खर्चातून कोल्हापूर व साठा पद्धतीचे 20 बंधारे बांधण्यात येणार आहेत. याशिवाय बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठीही एक कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे समजते. जिल्हा परिषदेतून बंधार्‍यांच्या कामांवर दर वर्षी कोट्यवधीचा खर्च केला जातो. यात नवीन बंधारे बांधली जातात, जुनी दुरुस्ती केली जातात, मात्र यातून प्रत्यक्षात किती पाणी उपलब्ध झाले, किती क्षेत्र सिंचनाखाली आले, किती शेतकर्‍यांना या बंधार्‍याचा फायदा झाला, याबाबत कोणतीही ठोस माहिती दिसत नाही.

संबंधित बातम्या :

असे असताना आता 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेतून कोल्हापूर पद्धतीचे नऊ बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी दीड कोटींचा खर्च येणार असल्याचे समजते. ही बंधारे पारनेर, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, नगर या तालुक्यात घेतली जाणार आहेत. तसेच, साठा बंधार्‍यासाठी सुमारे अडीच कोटींच्या खर्चातून 11 कामे घेण्यात आल्याचे समजते. ही कामे कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, नगर या चार तालुक्यात घेतलेली आहेत.

दुरुस्तीवर पुन्हा कोटभर रुपये खर्च!
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून दर वर्षी बंधार्‍यांच्या दुरुस्तीवर खर्च केला जातो. यापूर्वीही दर वर्षी दुरुस्तीवर मोठा खर्च केला जातो आहे. मात्र त्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी ऑडिट करण्याची गरज आहे. त्यातच या वर्षीही 12 दुरुस्तीची कामे घेतलेली आहेत. त्यासाठी सुमारे 1 कोटींचा निधी खर्च होणार आहे. ही कामे राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, जामखेड, पाथर्डी, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील बंधार्‍यांवर होणार आहेत.

नवीन कामांच्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत. यात कोल्हापूर पद्धतीने बंधारे, साठा बंधार्‍यांचा समावेश आहे. लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहेत.
                                                     – पांडुरंग गायसमुद्रे, कार्यकारी अभियंता

Back to top button