मुख्यमंत्री शिंदेंबाबत राऊत यांनी भांडवल करु नये

मुख्यमंत्री शिंदेंबाबत राऊत यांनी भांडवल करु नये

लोणी; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत संजय राऊत यांनी केलेले विधान आश्चर्यकारक आहे. या गोष्टीचे एवढे भांडवल करण्याची आवश्यकता नाही, मात्र महाविकास आघाडीच्या काळात स्कॅम मास्टर सचिन वाझे 'मातोश्री' व 'वर्षा'वर काय करीत होते, याचाही खुलासा कधी तरी खा. संजय राऊत यांनी केला पाहिजे, अशी खोचक प्रतिक्रीया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात अनेक स्कॅम झाले. या स्कॅममधील अनेकजण कधी 'मातोश्री' तर कधी 'वर्षा'वर आणि मंत्र्यांच्या बंगल्यांवर दिसत होते. त्यामुळे नागरीकांबरोबर भेटण्यास येणार्‍या प्रत्येकाची माहिती मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना नसते. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलेल्या व्यक्तिबाबत एवढे भांडवल करण्याची आवश्यकता नाही. याबाबत कोणतेही तथ्य नाही, जर काही असेल तर त्याची कारवाई होईल, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात सचिन वाझे कुठे -कुठे फिरत होते, खंडणी गोळा करायचे टार्गेट त्यांना कोणी दिले होते, याबाबत संजय राऊत गप्प का, असा सवाल त्यांनी केला.

मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पा. यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांची भावना आहे. त्यांच्या मागणीला सर्वांचा पाठींबा होता. या संदर्भात आता शासन स्तरावरुन सर्व कार्यवाही वेगाने सुरु आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला मिळालेले आरक्षण महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हलगर्जीपणामुळेच गेल्याचा घणाघात महसूलमंत्री विखे पा. यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news