नगर : पुढारी वृत्तसेवा : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 29) शिक्षक संघाच्या अधिवेशनात घुसून मराठा युवकांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे फोटो असलेले फ्लेक्स फाडून त्यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविला. त्यामुळे मंत्री केसरकर यांना आपला नियोजित दौरा ऐन वेळी रद्द करावा लागला. मंत्री महाजन आणि विखे पाटील हेही अधिवेशनाला अनुपस्थित राहिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांची महामंडळ सभा तसेच अहमदनगर जिल्हा शिक्षक संघ गुरुमाऊली सदिच्छा मंडळाचे त्रैवार्षिक अधिवेशन रविवारी येथील एन.आर. लॉन्स येथे आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निमंत्रण होते. मात्र, राजकीय नेत्यांशिवाय शिक्षक संघटनांनी आपला कार्यक्रम घ्यावा, अशी मागणी करतानाच सकल मराठा समाजाने मंत्र्यांच्या उपस्थितीला विरोध दर्शविला. सकल मराठा समाजाने त्यासाठी तसा इशारा देताच केसरकर यांना ऐन वेळी दौरा रद्द करावा लागला.
व्यासपीठावर मंत्री केसरकर, महाजन आणि विखे पाटलांचे फोटो असलेले फ्लेक्स झळकत होते. तसेच केसरकर यांचे नगरला येणे निश्चित झाले होते. याची कुणकुण लागताच सकल मराठा समाजाने अधिवेशनस्थळी धाव घेतली. व्यासपीठावर मंत्र्यांचे फोटो असलेले फ्लेेक्स फाडत त्यांना नगर बंदीची हाक दिली. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थितीलाही विरोध दर्शविला. अखेर शिक्षक संघटनेने फाटलेला फ्लेक्स खाली उतरविला आणि नंतर अधिवेशन सुरू झाले. ही माहिती समजताच मंत्री केसरकर यांनी नगरचा दौरा रद्द केला.
आमदारही फिरकले नाहीत
शिक्षकांच्या कार्यक्रमात मंत्र्यांसह आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित तांबे यांनाही निमंत्रण होते. मात्र मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित आमदारांनीही अधिवेशनाला जाणे टाळले.
पोलिसांचा फौजफाटा
मंत्री केसरकरांना विरोध करण्यासाठी मराठा संघटना शिक्षक अधिवेशनात येऊ शकतात, अशी कुणकुण पोलिस प्रशासनालाही लागली होती. त्यामुळेच अधिवेशनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. अधिवेशन संपेपर्यंत पोलिस तेथे तळ ठोकून होते.
प्रशासनाची तयारी वाया
मंत्री केसरकर यांचा नगर दौरा निश्चित झाला होता. त्यानुसार सकाळी 8.30 वाजता पुणे येथून नगरला येणार होते. येथील शिक्षक संघटनेच्या सभेला ते उपस्थित राहणार होते. नगरच्या शासकीय विश्रामगृहावर ते थांबणार असल्याने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती.
मंत्री केसरकर यांचा दौरा रात्रीच रद्द झाला होता. त्यांना आंदोलनासंदर्भात नगरमधून काही फोन गेले असावेत. तसेच मंत्री महाजन यांच्याशीही चर्चा झाली होती. त्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता कार्यक्रम थांबविण्याच्या सूचना केल्या होत्या.
– केशवराव जाधव, राज्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ
हेही वाचा :