

नगर; पुढारी वृत्तसेवा : कंटेनर-कारच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोघं मावसभाऊ जागीच ठार झाले तर डॉक्टर असलेले काका जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी तिघेही श्रीगोंदा येथील रहिवासी आहेत. जखमी डॉक्टर असून ते मृत मुलांचे काका असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी दुपारी हा भीषण अपघात झाला.
अक्षय भरत डोमसे (वय 30) आणि आयुष ऊर्फ वरद संतोष पवार (वय 18, दोघेही वडाळी, श्रीगोंदा) अशी मृत दोघांची नावे आहेत. डॉ. संजय अप्पासाहेब काळे असे जखमीचे नाव आहे. डॉ. काळे यांचे पारगाव (श्रीगोंदा) येथे क्लिनीक आहे. मृत अक्षय आणि आयुष हे दोघे त्यांच्या साडूची मुले आहेत. अक्षय हा भूमिअभिलेख कार्यालयात नोकरीस असून आयुष व शालेय शिक्षण घेतो. कामानिमित्त दोघं मावसभाऊ हे डॉक्टर असलेल्या काकांसोबत कारने नगरकडे येत होेते.
नगर-दौंड महामार्गावर बाबुर्डी बेंद शिवारात कंटेनर-कारची समोरासमोर धडक झाली. धडकेत कारचा चक्काचूर झाला. अक्षय आणि आयुष हे दोघे मावसभाऊ जागेवरच ठार झाले. डॉ. काळे हे दोघा तरुणांसह आय20 कारने नगरकडे येत होते. कंटेनर नगरकडून दौंडच्या दिशेने जात होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. अपघाताचा आवाज ऐकून आसपासचे नागरिक मदतीला धावले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच दोघे तरुण मृत झाले होते. डॉ. काळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा