धक्कादायक ! पिण्याच्या पाण्याच्या टाकीत टाकले रसायन

धक्कादायक ! पिण्याच्या पाण्याच्या टाकीत टाकले रसायन
Published on
Updated on

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तिसगावला पाणीपुरवठा करणार्‍या ऐंशी हजार लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने रसायन टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सोमवारी भेटीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तिसगावच्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच, जनतेच्या आरोग्यास धोका पोहचविणार्‍यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या भेटीवेळी आमदार तनपुरे यांनी सेतू केंद्राला भेट देत पाहणी केली. यावेळी तहसील कार्यालयातील काही अधिकार्‍यांना चांगलीच समज दिली. रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील काही लाभार्थ्यांनी आपल्या कामासाठी तहसील कार्यलयात हेलपाटे मारावे लागतात.

संबंधित बातम्या :

तिसगाव येथील ग्रामसेवक रवी देशमुख आमची अडवणूक करतात, अशा तक्रारींचा पाढा ग्रामस्थांनी आमदार तनपुरे यांच्याकडे वाचला. त्यानंतर तनपुरे यांनी पाथर्डी येथे येत तहसील व पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. या वेळी बाळासाहेब लवांडे, राहुल गवळी, उद्धव दुसुंग, सुनील पुंड, पंकज मगर, अमोल गारूडकर, राजेंद्र म्हस्के, भाऊसाहेब वाघ, सुनील पालवे, प्रदीप ससाणे, शबाना शेख, बिस्मिल्ला इनामदार आदी उपस्थित होते.

तहसील व पंचायत समिती कार्यालयात तनपुरे यांनी बैठक घेतली. सेतू कार्यालयात प्रकरणे दिली जातात, मात्र तहसील कार्यालयातून लवकर मंजुरी मिळत नाही. सर्वसामान्य लोकांना वारंवार हेलपाटे मारायला लावले जाते. किरकोळ त्रुटींसाठी प्रशासनाकडून वेठीस धरले जाते. काही दलालांनी अनेक लाभार्थ्यांकडून पैसे घेतले. मात्र, अजूनही मंजुरी मिळाली नाही. काही सेतू केंद्र चालक अडवणूक करतात, असा पाढा वाचल्यानंतर आमदार तनपुरे यांनी तहसीलदार श्याम वाडकर यांना बरोबर घेत, तहसील कार्यालय परिसरातील सेतू केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी कोणता दाखला किती दिवसात मिळेल, त्या साठी किती फी भरावी लागेल, याचे फलक लावलेले नव्हते. तनपुरे यांनी मी आठ दिवसांनी परत येणार असून, त्यावेळी असे फलक दिसायला हवेत, अशी तंबी सेतूचालक व प्रशासनाला दिली.

त्यानंतर आमदार तनपुरे हे पंचायत समिती कार्यलयात गेले. या वेळी अनेकांनी गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्याकडे तिसगावचे ग्रामसेवक रवी देशमुख यांची तातडीने बदली कण्याची मागणी केली. तिसगावसारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावात दोन दिवसांपूर्वी पाण्याच्या टाकीचे झाकण तोडून रासायनिक द्रव्य अज्ञात व्यक्तीने टाकल्याने ऐंशी हजार लिटर पाणी सोडून द्यावे लागले, अशी तक्रार केल्यानंतर आमदार तनपुरे सुध्दा अवाक झाले.

तातडीने तनपुरे यांनी देशमुख यांना फोन करत दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडूनही तुम्ही अद्याप या संदर्भात गुन्हा का दाखल केला नाही, तुम्ही पाण्याच्या टाकीची पाहणी अजून का केली नाही, तुम्हाला या घटनेचे गांभीर्य कळते का, गुन्हा दाखल करण्यासाठी थोडेतरी पाणी टाकीत शिल्लक ठेवले का, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. तर, गटविकास अधिकारी पालवे यांनी यावेळी देशमुख यांनी गुन्हा दाखल करण्याची परवानगी आपल्याकडे मागितल्याचे स्पष्ट केले. देशमुख यांच्या ऐवजी दुसर्‍याकडे पदभार देण्याच्या प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. आमदार तनपुरे यांनी लोकांच्या प्रश्नावर घेतलेल्या अ‍ॅक्शनमुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी चांगलाच धसका घेतला.

जिल्हा पोलिस अधीक्षकांना भेटणार
पाण्यात विषारी द्रव्य टाकणे हे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अत्यंत गंभीर प्रकार आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे. तहसील कार्यालयातील काही अधिकारी, सेतू चालकांना समज दिली आहे. पुन्हा आढावा घेऊन सूचनांचा पालन झाले की नाही, याची खातरजमा करणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news