ग्रामपंचायतीही मालामाल ! पंधराव्या वित्त आयोगाचा 56 कोटींचा पहिला हप्ता वर्ग | पुढारी

ग्रामपंचायतीही मालामाल ! पंधराव्या वित्त आयोगाचा 56 कोटींचा पहिला हप्ता वर्ग

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना 2023-24 या आर्थिक वर्षातील बंधित निधीचा पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यातील 1226 ग्रामपंचायतींना 56 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेतून लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार त्या-त्या ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगातून बंधित आणि अबंधित अशा दोन प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. यात ग्रामपंचायतींना 80 टक्के, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितींना 10-10 टक्के निधी वाटपाचे सूत्र ठरलेले आहे. त्यानुसार 2023-24 या आर्थिक वर्षातील बंधित निधीचा पहिला हप्ता नुकताच शासनाकडून प्राप्त झाला आहे.

त्या 94 ग्रामपंचायतींना ठेंगा!
जिल्ह्यात 1320 ग्रामपंचायती आहेत. मात्र यातील 94 ग्रामपंचायतींवर प्रशासक असल्याने त्या ग्रामपंचायतींना या निधीवाटपात तूर्त वगळण्यात आलेले आहेत.  तसेच निवडणुका जाहीर झालेल्या आणि प्रशासक असलेल्या 194 ग्रामपंचायतींना आयोगाचा निधी मिळणार नाही. उर्वरित 1226 ग्रामपंचायतींनाच 56 कोटींचा निधी वाटला जाणार आहे.

कोणती कामे करणे बंधनकारक!
स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल दुरुस्ती तसेच पेयजल, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग यावर 50 टक्के निधी खर्च करायचा आहे. तसेच ही कामे झालेली असतील तर प्रशासनाच्या सूचनांनुसार पुढील कामे घेण्याचेही शासनाचे निर्देश आहेत.

हेही वाचा :

Back to top button