नगर सराफ बाजार चोरी प्रकरण ; त्या वेळी पोलिस साखरझोपेत होते!

नगर सराफ बाजार चोरी प्रकरण ; त्या वेळी पोलिस साखरझोपेत होते!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी रविवारी पहाटे साडेचोवीस लाखांचा ऐवज लुटला, त्या वेळी घटनेनंतर कोतवाली पोलिस अवघ्या चार मिनिटांत घटनास्थळी पोहचले. कंट्रोल रूमला माहिती दिली. कंट्रोल रूमनेही लागलीच सर्व पोलिस ठाण्यांना अलर्ट दिला. मात्र, चोरटे नगर-मनमाड रस्त्याने एका कारमधून येवल्याला (जि. नाशिक) पोहोचले. मग अल्ट मिळूनही या मार्गावर नगर जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या सात पोलिस ठाण्यांनी नाकाबंदी का केली नाही? आणि नाकाबंदी केली असेल तर चोरटे का अडकले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत 'पहाटेची वेळ असल्याने, त्या वेळी पोलिस साखरझोपेत होते' अशी मिश्किल टिप्पणी नागरिक करत आहेत.

संबंधित बातम्या : 

सराफ व्यावसायिक संतोषवर्मा यांचे 'वर्मा ज्वेलर्स' या सराफ बाजारातील दुकानात रविवारी पहाटे साडेचार वाजता चोरी झाली. चोरटे कारमधून पसार झाले. त्याच वेळी कोतवाली पोलिस नियमित गस्तीवर असताना चोरट्यांच्या संशयित हालचालींबाबत त्यांना एका खासगी सुरक्षारक्षकाने माहिती दिली. पोलिस तातडीने 'वर्मा ज्वेलर्स' येथे पोहोचले. चोरटे तेथून जाऊन अवघे चार-पाच मिनिटे झाले होते. चोरी आणि चोरट्यांबाबत पोलिसांनी तातडीने कंट्रोल रूमला माहिती दिली आणि वर्मा यांनाही कळविले. पुढे कंट्रोल रूमने सर्व पोलिस ठाण्यांना या चोरीबाबत आणि चोरटे पळून गेल्याच्या दिशेबाबत अलर्ट दिला. मात्र चोरटे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नाशिक जिल्ह्यातील येवल्याला पोहोचले, तरी कोणत्याही ठाण्यातील पोलिसांच्या कथित नाकाबंदीत ते अडकले नाहीत.

येवल्याजवळ सापडलेल्या त्यांच्या कारमुळेे, ते नगर-मनमाड महामार्गानेच गेले असणार हे स्पष्ट असून, या मार्गावर असलेल्या जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्यांंना अलर्ट मिळाला नव्हता का, असेल, तर त्यांना नाकाबंदी केली नाही का, असे प्रश्न उपस्थित होत आहे.
सराफ बाजारातील ही चोरी परिसरातील अन्य दुकानांबाहेरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये कैद झाली. पहाटे 4.21 वाजता चोरांनी दुकान फोडण्यास सुरुवात केली आणि अवघ्या आठ मिनिटांत म्हणजे 4.29 वाजता चोरटे घटनास्थळावरून पसारही झाले, हे या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण साठविणारा 'डीव्हीआर'ही काढून नेला. यावरून त्यांनी पोलिसांच्या तांत्रिक तपासाचा अभ्यास करून ही चोरी केल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुकान फोडण्याआधी या चोरट्यांनी रात्री दोन वाजता कारमधून सराफा बाजारात एक फेरफटका मारल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधी रेकी करून ही चोरी झाल्याचे दिसते. दरम्यान, चोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांची दोन आणि कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तीन पथके रवाना झालेली आहेत.

'या' पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चोरटे पसार
नगर-मनमाड रस्त्यावर कोपरगावपर्यंत जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्यांची हद्द येते. यात तोफखाना, एमआयडीसी, राहुरी, लोणी, राहाता, शिर्डी, कोपरगाव ही पोलिस ठाणी आहेत. कंट्रोल रूमने वायरलेसवर सराफा बाजारातील चोरीचा मेसेज दिला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी कार्यतत्परता दाखवून नाकाबंदी केली असती तर चोरांना तत्काळ पकडता आले असते, असे म्हटले जात आहे.

सराफा असोसिएशनने घेतली एसपींची भेट
दरम्यान, मंगळवारी अहमदनगर जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेच्या शिष्टमंडळाने एसपी राकेश ओला यांची भेट घेऊन गुन्ह्याचा तपास जलदगतीने करून चोरांना अटक करण्याची मागणी केली. सराफा बाजारात दिवसा व रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली. यावेळी संतोष वर्मा, गणेश शेवंते, ओमप्रकाश सहदे, राजकुमार सहदेव, गोविंद वर्मा, गोपाल वर्मा, दिपक भवन, प्रकाश लोळगे आदींचे शिष्टमंडळ एसपींना भेटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news