Crop Insurance : कधी मिळणार, विम्याचे 25 टक्के? विमाधारक शेतकर्‍यांना प्रतीक्षा | पुढारी

Crop Insurance : कधी मिळणार, विम्याचे 25 टक्के? विमाधारक शेतकर्‍यांना प्रतीक्षा

नगर : पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448.1 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना सरासरी 413 मि.मी.पाऊस झाला. जिल्ह्यात जवळपास 8 टक्के पावसाची तूट आहे. 92 टक्के पावसाची नोंद झाली असली तरी जिल्हाभरातील 71 महसूल मंडलांत पावसाचा तब्बल 21 दिवस खंड पडला. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पन्नात 50 टक्क्यांपेक्षा अधिक घट निश्चित आहे. यापोटी विमा कंपनीकडून नुकसानीची 25 टक्के रक्कम अग्रीम म्हणून मिळणार आहे. ही रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा मात्र, विमाधारक शेतकर्‍यांना लागली आहे.

यंदा पहिल्या साडेतीन महिन्यांत फक्त पेरणीजोगा पाऊस झाला. अशा परिस्थितीत खरीप पेरणी शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाली. मात्र, 20 सप्टेंबरपर्यत पावसाने दडी मारली. त्यामुळे तब्बल 71 महसूल मंडलांत पावसाचा 21 दिवसांपेक्षा अधिक खंड पडला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पन्नात अधिक घट होणार आहे. यंदा विमा हप्ता फक्त एक रुपया असल्यामुळे जिल्हाभरातील जवळपास 12 लाख शेतकर्‍यांनी विमा उतरविला आहे. त्यामुळे या 71 मंडलांतील पीकविमा भरलेल्या शेतकर्‍यांना एकूण नुकसानभरपाईच्या 25 टक्के रक्कम आगाऊ लवकरच मिळणार आहे.

चार तालुक्यांत कमी पाऊस
जिल्ह्यात 21 सप्टेंबर रोजी 230 मि.मी. पावसाची नोंद होती. त्यानंतर आठ-दहा दिवसांत उत्तरा नक्षत्राच्या दमदार पावसाने जिल्हाभरात पाणीचपाणी केले. 30 सप्टेंबरपर्यंत सरासरी 413 मि.मी. पाऊस झाला. नगर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी व अकोले या पाच तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली. मात्र, श्रीरामपूर, राहुरी, कोपरगाव, संगमनेर या चार तालुक्यांत पावसाची सरासरी कमी आहे.
गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत 579.3मि.मी. म्हणजे 125 टक्के पावसाची नोंद झाली होती.

71 मंडलांत उत्पन्न घटणार

यंदाचा पावसाळा मिलिमीटर कंसात टक्के
नगर : 534.8 (110.8)
पारनेर 485.3 (116.5)
श्रीगोंदा 449.2 (110.8)
कर्जत 413.4 (91.9),
जामखेड 520 (89.9)
शेवगाव 463 (99.5),
पाथर्डी 494 (103.9),
नेवासा 368.2 (85.3)
राहुरी 277.9 (64)
संगमनेर 295.3 (83.7)
अकोले 508 (103.5)
कोपरगाव 289.6 (71.3)
श्रीरामपूर 221.1 (47.5)
राहाता 328.8 (72.2).

हेही वाचा :

Back to top button