नगर जिल्हयातील विकासकामांसाठी 26 कोटी उपलब्ध | पुढारी

नगर जिल्हयातील विकासकामांसाठी 26 कोटी उपलब्ध

नगर : पुढारी वृत्तसेवा :  स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी 25 कोटी 90 लाख रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मतदारसंघात विविध विकासकामे करण्यासाठी प्रत्येक आमदाराला आतापर्यंत 1 कोटी 85 लाख रुपये निधीचे वाटप करण्यात आले. सर्वच आमदारांनी कामांचे प्रस्ताव दाखल केले. मात्र, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. विधानसभा मतदारसंघात सभामंडप, रस्ते, पाणीपुरवठा, स्मशानभूमी बांधकाम व दुरुस्ती, शैक्षणिक कामे यासह विविध विकासकामे करण्यासाठी स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक आमदारांना वर्षाकाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध होत आहे.

2023-24 या आर्थिक वर्षात बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, शंकरराव गडाख, मोनिका राजळे, प्राजक्त तनपुरे, संग्राम जगताप, रोहित पवार, आशुतोष काळे, लहू कानडे, नीलेश लंके व डॉ. किरण लहामटे हे विधानसभेचे तर प्रा. राम शिंदे व सत्यजित तांबे हे विधानपरिषदेचे सदस्य असून, या प्रत्येक आमदारांना आतापर्यंत 1 कोटी 85 लाख रुपयांचा स्थानिक विकास निधी वाटप करण्यात आलेला आहे. या सर्वच आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील विकासकामांचे प्रस्ताव ऑनलाईन सादर केले आहेत. मात्र, कामांचे अंदाजपत्रक अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेले नाही.

खासदार निधीची प्रतीक्षा
केंद्र सरकारच्या वतीने मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी प्रत्येक खासदारांना वर्षाकाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध होतो. खासदार सदाशिव लोखंडे व डॉ. सुजय विखे पाटील यांना गेल्या आर्थिक वर्षातील 50 टक्के निधी अद्याप मिळालेला नाही. यंदाचे आर्थिक वर्ष सुरु होऊन, सहा महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, अद्याप एक पैशांचा निधी उपलब्ध झालेला नाही.

हेही वाचा  :

Nanded Hospital death : नांदेडची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी: शरद पवार

Krishna basin : कृष्णा खोर्‍यातील 38 धरणांमध्ये 84.73 टक्के पाणीसाठा

Back to top button