Nagar news : ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी | पुढारी

Nagar news : ग्रामपंचायतीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

कोळगाव : पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामपंचायतीची मुदत संपून एक वर्षाचा कालावधी लोटला असून, कोणत्याही क्षणी निवडणुकीची अधिसूचना निघू शकते. त्यामुळे सध्या इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. तिसर्‍या आघाडीच्या हालचाली गतिमान झाल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माजी सरपंच हेमंत नलगे व पंचायत समितीचे माजी सभापती पुरूषोत्तम लगड यांच्या दोन पॅनलमध्ये अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये पुरूषोत्तम लगड यांच्या पॅनलने 17 पैकी 9 जागा जिंकत बहुमत मिळविले होते. विरोधी पॅनलला आठ जागा मिळाल्या होत्या. परंतु, सरपंच पदाच्या उमेदवार वर्षा काळे या हेमंत नलगे यांच्या पॅनलमधून निवडून आल्या होत्या. तीन वर्षांनंतर लगड यांच्या गटाचे दोन सदस्य नलगे यांना मिळाल्याने उपसरपंचपदी सारिका मोहारे यांची निवड झाली. त्यामुळे ग्रामपंचायत व सोसायटीची सत्ता एकहाती नलगे यांच्याकडे आली.

यावेळी सरपंचपद ओबीसी पुरुष संवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. नलगे व लगड यांच्या गटातील काही उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने त्यांनी सवतासुभा मांडण्याचे ठरविले आहे. त्यांना गावातील दोन्ही गटावर नाराज असणार्‍या इच्छुक मंडळींनी साथ देण्याचे ठरविले आहे. अल्पावधीतच तिसर्‍या आघाडीची चर्चा कोळगावमध्ये रंगू लागली असून, त्यास माजी उपसरपंच अमित लगड यांच्या वाढदिवशी मूर्त स्वरूप मिळाले. भावी सरपंच म्हणून त्यांची परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली.

श्रीगोंदा कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे व आदेश नागवडे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्वतंत्र पॅनल ग्रामपंचायत मध्ये उतरवणार आहे. तिसर्‍या आघाडीची अंतिम बैठक राजेंद्र नागवडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तिसर्‍या आघाडीने सरपंच पदाच्या निवडणुकीत सक्षम उमेदवार देण्याचे ठरविले आहे. तसेच, ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत करण्यासाठी दोन्ही गटाला सक्षम पर्याय देण्याचे ठरविले आहे.

हेही वाचा :

Back to top button