शिर्डी विमानतळ प्रवासी टर्मिनलच्या कामाची 527 कोटींची निविदा प्रसिद्ध | पुढारी

शिर्डी विमानतळ प्रवासी टर्मिनलच्या कामाची 527 कोटींची निविदा प्रसिद्ध

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव मतदार संघातील श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाला चालना देवून विमान तळ विकासाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून 2023- 24 च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याची महायुती शासनाने तातडीने अंमलबजावणी करून या प्रवासी टर्मिनलच्या 527 कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध केल्याचे आ. आशुतोष काळे म्हणाले.

संबंधित बातम्या : 

देशातील धार्मिक देवस्थानांमध्ये दुसर्‍या क्रमांकाच्या शिर्डी येथील श्रीसाईबाबांच्या देश- विदेशातील असंख्य भक्तांना शिर्डीला येणे सोयीस्कर व्हावे, त्यांचा वेळ वाचावा व मतदार संघातील दुष्काळी परिसर असलेल्या काकडीसह परिसराचा विकास व्हावा, या उद्देशातून माजी आ. अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव मतदार संघातील काकडी येथे विमानतळ उभारण्यात आले. या विमानतळाचे सन 2017 साली लोकार्पण झाल्यापासून विमानतळावरून विमानांचे उड्डाणासाठी अनंत अडचणी येत होत्या. विमानतळावर डीव्हिओआर अर्थात कमी दृष्यमानतेवर मात करणारी ‘डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज’ सेवा बंद असल्यामुळे नाईट लँडिंग सुविधा देखील बंद होती.

अशा अनेक अडचणींच्या चक्रव्युहात काकडी विमानतळ सापडले होते. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने हे प्रश्न मांडले. अनेकवेळा मंत्रालयात बैठकादेखील घेतल्या. श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या देश- विदेशातील श्रीसाईभक्तांना काकडी विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या, कार्गो सेवा सुरू व्हावी, नाईट लँडिंग सुविधा सुरू व्हावी, काकडी व परिसराचे प्रश्न सुटावेत, यासाठी आ. काळे यांनी काकडी विमानतळासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 150 कोटी निधी मिळविला. तरीदेखील विमान तळाच्या विकासासाठी अधिक निधी मिळावा, यासाठी आ. काळे यांचा पाठपुरावा सुरुच होता. त्या पाठपुराव्याची दखल घेण्यात आल्याचे आ. काळे म्हणाले.

महायुती शासनाने 2023-24 च्या अर्थसंकल्पात प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी निधीस मजुरी दिली होती. या निधीतून होणार्‍या प्रवासी टर्मिनलच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. लवकरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होवून शिर्डी विमानतळाच्या समस्या सुटणार आहेत. काकडी परिसराचा वेगाने विकास मदत होणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. या कामाची तातडीने अंमलबजावणी केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ. काळे यांनी आभार मानले.

शिर्डी विमानतळाच्या सुटणार समस्या..!
महायुती शासनाने 2023-24 च्या अर्थसंकल्पात शिर्डी विमान तळाच्या प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी निधीस मजुरी दिली होती. या निधीतून होणार्‍या प्रवासी टर्मिनलच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. लवकरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होवून शिर्डी विमानतळाच्या समस्या सुटणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

Back to top button