चिंताजनक ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात दहा दिवस पुरेल इतकाच चारा

चिंताजनक ! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात दहा दिवस पुरेल इतकाच चारा

नगर : पुढारी वृत्तसेवा  :  जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हातातून गेला आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासह आता जनावरांच्या चार्‍याचीदेखील चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नगर, राहाता, कोपरगाव, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, नेवासा, संगमनेर या आठ तालुक्यांत अवघे 10 दिवस पुरेल इतकाच चारा शिल्लक असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे आता भरपावसाळ्यात जिल्ह्यात छावण्या अन् चारा डेपोची गरज निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या :

पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटत आली तरीही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाची कपाशी, सोयाबीन व अन्य पिके वाया गेली. शिवाय जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या अशी सुमारे 19 लाखांपेक्षा अधिक जनावरे आहेत. त्यांना दर महिन्याला 8 लाख मे.टन. चारा लागतो. ऑगस्टअखेर 13 लाख मे.टन चारा शिल्लक असल्याचे प्रशासनाचे आकडे सांगत आहेत. मात्र आता पाऊसच नसल्याने नवीन निर्माण होणारा चारा आणि आवश्यक चारा, याचे गणित न जुळणारे असेल. त्यामुळे या परिस्थितीत आहे तो चारा संपल्यानंतर काय, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत सापडला आहे.

चारानिर्मिती कागदावरच!
चार्‍याची संभाव्य टंचाई लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून चारानिर्मितीसाठी शेतकर्‍यांना आवाहन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 7 हजार शेतकर्‍यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचेही समजले. मात्र अजूनही बियाणे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे बियाणेवाटप कधी होणार, शेतकरी ते कधी लावणार आणि ते जनावरांना खाण्यायोग्य कधी तयार होणार, याविषयी मात्र संभ्रमावस्था आहे.फ

चार्‍याची सध्याची स्थिती (मेट्रिक टन)
तालुका जनावरे दरमहा चारा उपलब्ध संपणार
नगर 254815 69886 87968 सप्टेंबर
राहुरी 259418 69951 161162 ऑक्टोबर
श्रीरामपूर 127910 33589 109402 नोव्हेंबर
पारनेर 306000 70221 169020 ऑक्टोबर
राहाता 131489 36539 38900 सप्टेंबर
कोपरगाव 112772 32860 33629 सप्टेंबर
अकोले 171850 46826 190163 डिसेंबर
श्रीगोंदा 257507 64821 40218 सप्टेंबर
कर्जत 261665 64639 134469 ऑक्टोबर
जामखेड 124455 34991 38691 सप्टेंबर
पाथर्डी 251345 56927 61767 सप्टेंबर
शेवगाव 204224 47530 153710 नोव्हेंबर
नेवासा 273763 74058 42300 सप्टेंबर
संगमनेर 341863 88063 75808 सप्टेंबर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news