घुले, अभंग, जगतापांनीही शरद पवारांना सोडलेच? | पुढारी

घुले, अभंग, जगतापांनीही शरद पवारांना सोडलेच?

नगर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीतील बंडानंतर नगरमध्ये शरद पवार गटाने बोलावलेल्या कालच्या बैठकीकडे माजी आमदार चंद्रशेखर घुले, नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग आणि राहुल जगताप यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील 30 पदाधिकार्‍यांनी पाठ फिरविल्याचे दिसले. दरम्यान, कोणी कितीही सोडून गेले तरी पक्षाला फरक पडत नाही. 2019 प्रमाणेच आजही जिल्हा शरद पवार यांच्यासोबत असल्याचा विश्वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

आमदार नीलेश लंके, किरण लहामटे, आशुतोष काळे आणि संग्राम जगताप यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षाची परिस्थिती काय आहे, पक्षासोबत कोण-कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी काल नगर येथे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनात बैठक बोलावली होती. अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. तर नगरची जबाबदारी असलेल्या प्राजक्त तनपुरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रत्येक मतदारसंघात फिनिक्सप्रमाणे राष्ट्रवादी भरारी घेईल, असा विश्वास दिला.

ऑक्टोबरमध्ये शरद पवार शिर्डीत
ऑक्टोबरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीत राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर होणार असल्याचे राजेंद्र फाळके यांनी सांगितले. त्यापूर्वी नगरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असल्याचेही सांगण्यात आले.

बैठकीला कोण हजर
माजी आमदारांपैकी केवळ दादाभाऊ कळमकर हे एकमेव हजर होते. जामखेडचे दत्ता वारे, शेवगावचे कैलास नेमाणे, नेवाशाचे काशीनाथ नेमाणे, राहुरीचे मच्छिंद्र सोनवणे, नगरचे रोहिदास कर्डिले, पाथर्डीचे शिवशंकर राजळे, तसेच नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघातील अध्यक्ष सुनील आडसुरे आदी उपस्थित होते.

कोणी फिरवली पाठ
पक्षाच्या बैठकीकडे आमदार नीलेश लंके, किरण लहामटे, संग्राम जगताप, आशुतोष काळे यांच्यासह माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, राहुल जगताप या दिग्गजांची अनुपस्थिती दिसली. शिवाय, युवक, युवती जिल्हाध्यक्षांसह विविध सेलचे 30 पदाधिकारी अनुपस्थित होते.

Back to top button