साहेबांचे जिल्हाध्यक्ष दादांच्या प्रेमात ! | पुढारी

साहेबांचे जिल्हाध्यक्ष दादांच्या प्रेमात !

नगर : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवारांसोबत गेलेल्या नगरच्या कार्यकर्त्यांना पक्षातून तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी भवनातील शहर जिल्हाध्यक्षांच्या नावाचे फलक तोडल्यावरून अजित पवार गट शरद पवार गटाविरोधात थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. यावरच हे थांबले नाही, तर कालच्या पत्रकार परिषदेत पक्षातून बाहेर पडलेल्या आमदारांसह काही माजी आमदारांच्या मतदारसंघात पक्षबांधणीसह त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका मांडण्याचीही भीष्मप्रतिज्ञा करण्यात आली. मात्र एवढे सर्व सुरू असताना अजूनही शरद पवारांच्या ताब्यात असलेल्या नगरच्या राष्ट्रवादी भवनातून अजित पवारांचा फोटो हटविण्याचे धाडस जिल्हाध्यक्षांनाही झाले नसल्याने, याविषयी कार्यकर्तेच संभ्रमात आहेत.

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार गटाने माझे फोटो वापरू नयेत, असे स्वतः शरद पवार जाहीरपणे सांगत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या ताब्यात असलेल्या नगरच्या राष्ट्रवादी भवनातच अजित पवार यांची प्रतिमा दिमाखात झळकत आहे. त्यामुळे दोन्ही गटांतील सामान्य कार्यकर्ता बुचकळ्यात पडले आहेत.

राष्ट्रवादीत शरद पवार व अजित पवार यांचे दोन गट पडले आहेत. ही लढाई आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचली असताना कार्यकर्तेही वेगवेगळ्या गटांत दाखल झाले आहेत. त्याचे लोण नगरमध्येही पोहोचले आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेण्यावरून शरद पवार गट व अजित पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे आणि शरद पवार गटातील अभिषेक कळमकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्याने पोलिसात तक्रारही दिल्याचे प्रकरणही ताजे आहे. या घडामोडीत आता नगरचे जिल्ह्यातील आमदार नीलेश लंके, संग्राम जगताप, किरण लहामटे, आशुतोष काळे हे अजित पवारांच्या गटात गेले. जिल्हा कार्यकारिणीलाही भगदाड पडले. अशा परिस्थितीतही राष्ट्रवादी भवन हे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या नेतृत्वातील शरद पवार गटाकडे आहे.

दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेतही जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी जे पक्ष सोडून अजित पवार गटात गेले, त्या आमदारांविरोधात, तसेच माजी आमदारांच्या मतदारसंघात लवकरच पुनर्बांधणी करून आक्रमकपणे विरोध करण्याची भूमिका मांडणार असल्याचे सांगितले. पक्षाचे जिल्हा प्रभारी आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही पदाधिकार्‍यांना शरद पवारांविषयीच्या निष्ठेचे डोस दिले. मात्र प्रत्यक्षात आजही जिल्हाध्यक्ष फाळके आणि शहर जिल्हाध्यक्ष कळमकर यांच्या दालनात अजित पवारांचे फोटो झळकत असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

कार्यकर्त्याने काय समजायचे?
शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटाने अनेक शाखा ताब्यात घेतल्या. तशीच परिस्थिती राष्ट्रवादीतील बंडानंतरही दिसेल अशी चर्चा होती. मात्र शरद पवार यांनी बहुतांश कार्यालये ही राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावे उभारली आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या अधिपत्याखाली नगरचेही राष्ट्रवादी भवन आहे. कळमकर यांनी माणिक विधाते यांचा फलक हटवून ते सिद्धही केले. मात्र तरीही आज जिल्हाध्यक्षांच्या दालनात अजित पवारांचा फोटो कायम असल्याने सामान्य कार्यकर्त्याने काय समजायचे, असा सवाल पुढे येत आहे.

हेही वाचा :

Back to top button