

नगर : पुढारी वृत्त्तसेवा : दवाखान्यातील उपचारासाठी माध्यमिक शिक्षक सोसायटीत दाखल केलेले सभासदाचे कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचे सांगून, त्या व्यक्तीच्या मरेपर्यंत कर्जाची रक्कम रोखून धरल्याचा आरोप करून विरोधी संचालक व न्यू आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या प्राध्यापक, प्राध्यापिकांनी माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर काल निदर्शने केली. सविता लक्ष्मण भुसाळ या रुईछत्तीसी येथील महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर कार्यरत होत्या. मागील दोन वर्षापूर्वी त्या शहरातील न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयात अनुदानित तत्वावर रुजू झाल्या. मात्र त्या कर्करोगाने ग्रस्त झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी काही दिवसांपूर्वी विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.
कॅन्सरच्या उपचारासाठी त्यांनी यापूर्वी देखील सोसायटीतून कर्ज घेतले होते. मात्र मोठ्या प्रमाणात पैसे लागत असल्याने उपचारासाठी त्यांच्या स्वाक्षरीने 10 लाख रुपयाच्या कर्ज रोख्यासाठी दोन जामीनदार असलेल्या त्यांच्या सहकारी प्राध्यापिका व त्यांच्या पतीच्या उपस्थितीमध्ये शनिवारी (दि.2 सप्टेंबर) सकाळी माध्यमिक शिक्षक सोसायटीत अर्ज दाखल करण्यात आला. यावर सोसायटीकडून कर्ज मंजूर झाले असून, पैसे खात्यात वर्ग केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु सोसायटीने कर्जाचे पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केले नाही. शेवटी पैश्याअभावी त्यांचा डिस्चार्ज घेवून मुळगावी नवलेवाडी (ता. अकोले) येथे घेवून जाण्यात आले. घरीच त्यांचा उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकारी प्राध्यापिकांनी दिली.
दरम्यान, या आंदोलनात विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे यांच्यासह उपप्राचार्या कल्पना दारकुंडे, प्रतिभा पवार, स्वाती ससे, कुर्नुलकर, मुळे, शारदा साठे, आशा रोकडे, अर्चना कोहोक, प्रीतम पवार, कविता उगले, स्वाती कलापुरे, जयश्री शेळके, रंजना पठारे, मंदा कराळे, आदींसह शिक्षक, प्राध्यापक सहभागी झाले होते. दरम्यान, यावेळी तज्ज्ञ संचालक भाऊसाहेब कचरे यांनी आंदोलंकांशी संवाद साधत सभासदाच्या मृत्युबाबत शोक व्यक्त केला.
संबंधित सभासद ह्या आजारी असल्याची कर्मचार्यांना माहिती होती. शनिवारी संबंधितांचे सह्याचे नमुने जुळले नाही. तसेच त्यांचा अर्ज दुसर्याने दिल्यामुळे कर्मचार्यांना संशय आला. त्यामुळे त्या दिवशी कर्जप्रकरण न करता खात्री करण्यासाठी ते मागे ठेवले. दुसर्या दिवशी रविवार आला. तिसर्या दिवशी त्या मयत झाल्या. संबंधित सभासदाच्या मृत्युचे आम्हालाही दुःख आहेच. मात्र आता मयत सभासदाच्या नावे कर्ज द्यावे, यावरून विरोधक राजकारण करत आहेत.
– दिलीप काटे, अध्यक्ष, माध्यमिक सोसायटीशिक्षक सोसायटीत सभासदाचा कर्ज अर्ज आल्यानंतर तो तत्काळ मंजूर होतो. मात्र संबंधित महिला सभासदास उपचारासाठी कर्जाची गरज असताना कर्ज दिले नाही. वेळेत पैसे मिळाले असते तर कदाचित त्या वाचल्या असत्या. निवृत्त संचालक तेथे बसून राहतात. चेअरमनने संस्था पहायला हवी. कर्जाचा अर्ज जामीनदाराने दिला.
– अप्पासाहेब शिंदे, विरोधी नेते
हेही वाचा :