कर्जत : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या उपनगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले व युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. 13) अधिकार्यांच्या मनमानीविरुद्ध नगरपंचायतीवर मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनात युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन घुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, ज्येष्ठ नेते तात्या ढेरे, नगरपंचायतीमधील भाजपच्या विरोधी पक्षनेत्या माया दळवी, नगरसेविका मोहिनी पिसाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, ओंकार तोटे, माझीद सय्यद, राजू बागवान यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्याधिकारी साळवे, इतर कर्मचारी व काही नगरसेवकांना कार्यालयाबाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकण्यात आले.
या वेळी नगरपंचायत कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून आंदोलन केले. माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, सुनील शेलार, उपगटनेते सतीश पाटील, यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक त्यांच्या मागण्यांवर ठाम होते. टाळे ठोकल्यानंतर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगरपंचायत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
या दरम्यान मुख्याधिकारी साळवे यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोडगा निघाला नाही. यावेळी सचिन घुले यांनी सांगितले, नगरपंचायत कार्यालय बेमुदत बंद ठेवू, आमच्यावर गुन्हे नोंदवले तरी चालतील, नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात एक कोटी रुपयांचे बक्षीस पटकावले. त्यातील 80 लाख रुपये खर्चही झाले. याबद्दल माहिती दिली जात नाही, याचा अर्थ या खर्चात गैरव्यवहार झाला आहे. असा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामधून वरिष्ठ अधिकार्यांनी कार्यवाही करण्याची भूमिका घेतली तरच आंदोलन मागे घेतले जाईल, असेही घुले यांनी बजावले.
उपनगराध्यक्ष रोहिणी घुले म्हणाल्या, नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला. यासाठी मोठी रक्कम शासनाने दिली, ही रक्कम खर्च करण्यात येत आहे. मात्र, ही कशी खर्च केली, कोणती निविदा देण्यात आली. याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांनीही विविध आरोप केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे पत्र ई-मेलद्वारे पाठविल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
हे ही वाचा :