

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नेवाशातील ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी बुधवारी (दि. 6) शहरातील वकिलांनी देवस्थानावर वाजत गाजत जनआक्रोश मोर्चा काढला. महाराजांच्या विरोधात विविध मागण्यांचे निवेदन विश्वस्त मंडळाला देण्यात आले. दरम्यान, विश्वस्त देशमुख महाराजांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. वकील संघ व इतर जनतेकडून आलेल्या निवेदनांची विश्वस्त मंडळाने दखल घेतल्याचे सांगून विश्वस्त देशमुख महाराजांकडे खुलासा मागितला आहे. महाराजांकडून खुलासा येताच लोकहिताचा निर्णय निश्चितच घेतला जाईल, असे आश्वासन मंदिर देवस्थानचे अध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी मोर्चेकर्यांना दिले.
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांची हकालपट्टी करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी दुपारी दीड वाजता नेवासा वकील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब गरड व कैलास कापसे यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही वकील संघांच्या पदाधिकार्यांनी पंचायत समितीपासून ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत वाजत गाजत मोर्चा काढून प्रतिकात्मक धोतरफेड आंदोलन केले.
वादग्रस्त ठरलेले विश्वस्त देशमुख महाराज यांनी स्वतःहून राजीनामा देणे आवश्यक होते; मात्र तसे न होता गुंडगिरीची भाषा सुरू झाली. वादग्रस्त विश्वस्त महाराजांच्या वागण्यामुळे देवस्थानची बदनामी होत आहे, असे आरोप आरोप वकील संघांनी केले आहेत.
महाराजांची हकालपट्टी न केल्यास विश्वस्तांच्या कार्यालयास कुलूप लावून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी अॅड. कारभारी वाखुरे, अॅड. अण्णासाहेब अंबाडे, अॅड. बन्सी सातपुते, पोपट आघाव, जयंत गुडधे आदींनी मनोगत व्यक्त करताना दिला.
वादग्रस्त महाराजांच्या गैरकृत्यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, त्यांनी संस्थांच्या नावाखाली जमविलेल्या मालमत्तेची चौकशी करून कारवाई करावी, महिलेवर केलेल्या अत्याचाराची गोपनीय चौकशी होऊन पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांना देण्यात आले.
हेही वाचा