Mula Dam : चिंताजनक! ऐन पावसाळ्यात घटतोय मुळा धरणातील पाणीसाठा

Mula Dam : चिंताजनक! ऐन पावसाळ्यात घटतोय मुळा धरणातील पाणीसाठा
Published on
Updated on

राहुरी(अहमदनगर) : दक्षिण नगर जिल्ह्याची तृष्णा भागविताना शेतकर्‍यांच्या पिकांना जीवदान देणार्‍या मुळा धरणातील पाणीसाठ्याची आकडेवारी चिंताजनक बनली आहे. ऑगस्ट महिन्यात धरण भरते; परंतु धरणसाठा 21 हजार 500 दशलक्ष घनफूट झाला असताना मान्सून काळात साठ्यात वाढ होण्याऐवजी घट होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

मुळा धरणामध्ये 1972 पासून पाणी जमा होण्यास प्रारंभ झाला. धरणाने अनेक दुष्काळांत जिल्ह्याचा सारथी होत शेतकर्‍यांना संकटातही साथ दिली. नगर शहरासह औद्योगिक वसाहत, राहुरी व देवळाली प्रवरा नगर परिषद हद्द व सुमारे 6 प्रादेशिक पाणी योजनांद्वारे लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मुळाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. यासह धरणाचा डावा कालवा, उजवा कालव्यासह वांबोरी चारी, भागडा चारीवर आधारित लाखो हेक्टर शेतीचा तारणहार म्हणून धरणाकडे पाहिले जाते.

यंदा पावसाने यंदा उलटचक्र फिरवीत धरण साठ्यात वाढ करण्याऐवजी धरणसाठा कमी करण्याची नामुष्की जिल्ह्यावर आणली. मुळा धरणामध्ये सद्यःस्थितीला 21 हजार 500 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जुलै महिन्यापासून पावसाने दडी मारलेली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर तर पावसाने पूर्णपणे उघडिप घेतलेली आहे. परिणामी डोंगराच्या घाटमाथ्यातून झिरपणारे पाणी वगळता नवीन आवक पूर्ण ठप्प झाली आहे. धरणाकडे अत्यल्प 300 क्युसेक आवक होत असताना खरीप पिके वाचविण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. धरणाचा उजवा कालवा 1 हजार 300 क्युसेक तर डावा कालवा 150 क्युसेकने वाहत आहे.

आवकच नसल्याने ऐन मान्सूनमध्ये पाणीसाठा खालावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मुळा धरणामध्ये सध्या 82 टक्के पाणी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रावर मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. परंतु जिल्ह्यातील हवामान परिस्थितीमध्ये उन्हाळ्यासारखे ऊन चटकत असताना रिमझिम थेंबही थांबले आहेत. अशा परिस्थितीने जिल्ह्यावर दुष्काळाची गडद छाया निर्माण झालेली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा झपाट्याने घटत आहे.

धरण भरणार की नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे. 4 हजार 500 दलघफू मृत साठा वगळता केवळ 15 हजार 500 दलघफू पाणी साठ्याचा वापर करता येणार आहे. त्यापैकी 3 हजार दलघफू पाणीसाठ्यावर समन्यायीची वक्रदृष्टी आहे. तर पिण्याचे पाणी, औद्योगिक वसाहत व महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आरक्षित पाण्यासह बाष्पीभवन पाहता शेतकर्‍यांना मुळा धरणातून यंदा पाणीच नसेल अशीच भीती निर्माण होत आहे. कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाभियंता राजेंद्र पारखे यांच्याकडून जिल्हाधिकार्‍यांकडे पाणीसाठ्याचे अहवाल वेळोवेळी सादर केले जात आहेत.

मराठवाडा पाटबंधारेकडून आढावा

जायकवाडी धरणातही पाणीसाठ्याची परिस्थिती खालावली आहे. परिणामी समन्यायीची टांगती तलवार पाहता मराठवाडा पाटबंधारे विभाग जिल्ह्यातील धरणांच्या आकडेवारीकडे लक्ष देऊन आहे. संबंधित विभागाने मुळा धरणाच्या पाणी साठ्याबाबत काही दिवसांपूर्वीच आढावा घेतल्याचे समजते आहे.

काटकसर हाच पर्याय : सायली पाटील

मुळा धरणामध्ये पाणीसाठा चिंताजनक आहे. आगामी परिस्थिती पाहता शेतकर्‍यांसह योजना लाभार्थ्यांनी पाण्याचा अत्यंतकाटकसरीने वापर करावा. पावसाने अवकृपा राखल्यास पाण्याचे मोठे संकट आहे. पाटबंधारे विभाग परिस्थितीचा आढावा घेऊन उचित नियोजन करीत असल्याचे मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

मुळा धरण आज…
21349 दशलक्ष घनफूट

विसर्ग
उजवा कालवा 1500 क्युसेक
डावा कालवा 150 क्युसेक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news