अमेरिकन ग्रीन कार्डचा प्रतीक्षा कालावधी तब्बल १३४ वर्षे !!!

अमेरिकन ग्रीन कार्डचा प्रतीक्षा कालावधी तब्बल १३४ वर्षे !!!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  पालकांच्या नोकरीवर डिपेंडंट व्हिसा घेऊन अमेरिकेत राहत असणाऱ्या आणि वयाची २१ वर्षे पूर्ण केलेल्या मुलांवर मायदेशी परत पाठवले जाण्याची टांगती तलवार आहे. विशेष म्हणजे सध्या अमेरिकेतील १०.७ लाख भारतीय रोजगाराशी संबंधित ग्रीन कार्ड बॅकलॉगमध्ये अडकले आहेत. ईबी २ आणि ईबी ३ कॅटेगरीमधील या अर्जांची प्रक्रिया करायची ठरवली तर तब्बल १३४ वर्षे लागतील. त्यामुळे अमेरिकेत राहणारी सुमारे १.३४ लाख भारतीय मुले ग्रीन कार्ड मिळण्यापूर्वी म्हातारी होतील, असा अंदाज एका अभ्यासात वर्तवण्यात आला आहे.

भारतीय कुशल कर्मचाऱ्यांना अमेरिकेत मोठी मागणी आहे. बहुतांश भारतीय नोकरीसाठी एच१बी व्हिसा घेऊन अमेरिकेत जातात. तर त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सदस्य डिपेंडंट व्हिसा घेऊन अमेरिकेत दाखल होतात. अमेरिकेतील भारतीयांचा रोजगाराशी निगडित ग्रीन कार्ड ब्लॅकलॉग मार्च २०२३ मध्ये १०.७ लाखांवर गेला आहे. प्रत्येक वर्षी अमेरिका रोजगाराशी निगडित १. ४ लाख ग्रीन कार्ड अर्ज बाजूला ठेवते. ही संख्या भारताच्या निर्धारित मर्यादेच्या तुलनेत ७ टक्के आहे. मृत्यू, मर्यादेपेक्षा जास्त वय आदी कारणांमुळे हे अर्ज बाद केले जातात. त्यामुळे ग्रीन कार्डसाठीची प्रतिक्षा ५४ वर्षांवर गेली आहे. तर सर्व अर्जांची प्रक्रिया करायचे झाल्यास तब्बल १३४ वर्षे लागण्याची शक्यता आहे. कॅटो इन्स्टिट्यूटचे इमिग्रेशन स्टडिजचे सहयोगी संचालक डेव्हिड जे. बायर यांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

अमेरिकेत डिपेंडंट व्हिसावर गेलेल्या मुलांचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त झाले तर ते एच-४ व्हिसावर तेथे राहू शकत नाहीत. पालकांच्या एच१बी व्हिसाशी तो संलग्न असतो. २१ वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यावर या मुलांना एफ-वन व्हिसाशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहत नाही. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी हा व्हिसा जारी केला जातो. परंतु, मर्यादित रोजगाराच्या संधी आणि जास्त शुल्क अशी अनेक आव्हाने या व्हिसाशी निगडित आहेत. हा व्हिसा मिळाला नाही तर भारतात परतणे किंवा इतर दुसऱ्या देशात जाणे हेच पर्याय शिल्लक राहतात. विशेष म्हणजे एच-४ व्हिसाची मुदत संपलेले बहुतांश मुले अमेरिकेत लहानाचे मोठे झाले असून मातृभूमीशी असलेली त्यांची नाळ तुटलेली आहे. भारतात परतल्यास त्यांना आणखी आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेतील इमिग्रेशन संशोधन विधेयक रेंगाळले आहे. प्रत्येक देशासाठी असलेली रोजगाराशी निगडित ग्रीन कार्डवरील मर्यादा वाढवण्याचा उल्लेख या विधेयकात आहे. नुकतेच अमेरिकी चिल्ड्रन बील सादर करण्यात आले होते. यात २१ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांचा विचार करण्यात आलेला आहे. परंतु, हे विधेयक कधी लागू होणार याची काही निश्चितता नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news